
Satara : पालिका शाळेत प्रवेशासाठी झुंबड
कऱ्हाड : पालिका, जिल्हा परिषद शाळांतील शैक्षणिक गुणवत्ता घसरल्याने पालकांचा ओढा खासगी शाळांकडे वाढला आहे. मात्र, त्याला छेद देत येथील पालिका शाळा क्रमांक तीन ही महाराष्ट्रातील सर्वाधिक पटसंख्या असलेली शाळा बनली आहे.
दर्जेदार शिक्षण पद्धती, पहिलीपासूनच स्पर्धा परीक्षांची करून घेतली जाणारी तयारी, मेहनत घेऊन शिकवणारे शिक्षक, लोकसहभागातून केलेली भौतिक सुविधांची निर्मिती, शिस्त यामुळे आपल्या मुलाला त्याच शाळेत प्रवेश मिळण्यासाठी पालक गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पहाटेपासूनच प्रवेशासाठी रांग लावून आहेत.
शाळेत ज्ञानदानाचे पवित्र काम चांगल्या पद्धतीने शिक्षकांच्या टीमवर्कने केले जाते. विद्यार्थ्यांच्या पायाही पहिलीतच भक्कम केला जातो. त्यामुळे विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकतात. गेली अनेक वर्षे आम्ही हाच पॅटर्न कायम ठेवल्याने पालिका शाळा क्रमांक तीन ही देशातील सर्वाधिक पटसंख्या असलेली शाळा बनली आहे.
— अर्जुन कोळी, मुख्याध्यापक
मुलगा मंथन याची स्पर्धा परीक्षेसाठी पहिलीपासूनच शाळेत शिक्षकांनी तयारी करून घेतली. त्यामुळे तो बीडीएस, एमटीएस या परीक्षेत चमकलाच शिवाय तो पाचवीत असताना त्याची सैनिक स्कूलला निवड झाली. शिष्यवृत्तीमध्येही तो राज्यात दुसरा आला. नवोदय विद्यालयासाठीही त्याची निवड झाली.
- राधिका थोरात, पालक