esakal | ...तर तुमच्या आधी माझीच धरणात उडी : नरेंद्र पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

...तर तुमच्या आधी माझीच धरणात उडी : नरेंद्र पाटील

जलसंपदामंत्री जयंत पाटील तसेच सातारा व सांगली जिल्ह्यांतील आधिकाऱ्यांसमवेत चर्चा झाली आहे. लवकरच मंत्रालयस्तरावर बैठक होईल असे नरेंद्र पाटील यांनी धरणग्रस्तांना आश्वासित केले.

...तर तुमच्या आधी माझीच धरणात उडी : नरेंद्र पाटील

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ढेबेवाडी (जि.सातारा)  : मागण्या धुडकावून तुम्हाला कुणीतरी येथून हुसकावून लावेल ही भीती पहिल्यांदा मनातून काढून टाका. तुम्ही एकटे नाही, मी तुमच्यासोबत आहे आणि तशी वेळ आलीच तर तुमच्या आधी आंदोलनासाठी मी स्वतः धरणाच्या पाण्यात उतरेन, अशा शब्दात अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी मराठवाडी धरणांतर्गत उमरकांचन (ता. पाटण) येथील धरणग्रस्तांना दिलासा दिला. 

सांगली जिल्ह्यातील माहुली गावठाणात पुनर्वसनाचे नियोजन असलेल्या उमरकांचन येथील खालचे आवाडातील काही कुटुंबांनी नियमाप्रमाणे पाण्याची उपलब्धता असलेली बागायती किंवा चारपट जमीन द्यावी, ते शक्‍य नसल्यास अन्य धरणग्रस्तांप्रमाणे रोख रक्कम देण्यात यावी, या मागणीसाठी अजूनही मूळ गाव सोडलेले नाही. यंदाच्या पावसाळ्यात धरणग्रस्तांच्या घरांमध्ये पाणी घुसण्याची भीती असल्याने मागण्या मार्गी लागेपर्यंत संबंधित कुटुंबांना गावकडेच निवारा शेड बांधून त्यात स्थलांतरित करावे, यासाठी नरेंद्र पाटील शासनस्तरावर पाठपुरावा करत आहेत. त्यांनी उमरकांचनला जावून परिस्थितीची पाहणी केली.
 
ते म्हणाले, या प्रश्नी जलसंपदामंत्री जयंत पाटील तसेच सातारा व सांगली जिल्ह्यांतील आधिकाऱ्यांसमवेत चर्चा झाली आहे. लवकरच मंत्रालयस्तरावर बैठक होईल. तत्पूर्वी निवारा शेड व अन्य प्रश्न मार्गी लावण्यासाठी दोनच दिवसांपूर्वी मी सातारा जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन दिले. लवकरच ते संबंधितांची बैठक घेणार आहेत. यावेळी जनजागर प्रतिष्ठानचे जितेंद्र पाटील, जयवंत भोसले, आनंदराव मोहिते, कृष्णत मोहिते, छबुताई मोहिते, बापूराव देसाई, मारुती मोहिते, सुरेश मोहिते, शंकर मोहिते, लक्ष्मण मोहिते आदी धरणग्रस्तांनी विविध प्रश्न मांडले. मेंढ येथील प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांबाबतही जितेंद्र पाटील यांनी नरेंद्र पाटील यांच्याबरोबर आज चर्चा केली. 

माझ्या गावच्या मातीतल्या माणसांचे प्रश्न सोडविणे माझे कर्तव्यच आहे. जोपर्यंत धरणग्रस्तांच्या मागण्यांवर ठोस तोडगा आणि अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही. 
नरेंद्र पाटील, अध्यक्ष, अण्णासाहेब पाटील महामंडळ 

Video : यंदा ना वाहनांचे कर्कश हॉर्न, ना पोलिसांच्या शिट्ट्या 

 
 

loading image