esakal | सातारा पालिकेचा 298 कोटींचा अर्थसंकल्प; उद्या होणार ऑनलाइन सभा
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

गेल्या सप्टेंबर महिन्यात झालेल्या हद्दवाढीमुळे शाहूपुरी, विलासपूर, शाहूनगर, पिरवाडीसह परिसरातील उपनगरे पालिकेत सामील झाली आहेत.

सातारा पालिकेचा 298 कोटींचा अर्थसंकल्प; उद्या होणार ऑनलाइन सभा

sakal_logo
By
गिरीश चव्हाण

सातारा : हद्दवाढीमुळे सातारा पालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प 298 कोटी 66 लाख रुपयांच्या घरात जाऊन पोचला आहे. हा अर्थसंकल्प मंजूर करण्यासाठीची सभा शुक्रवारी (ता. 26) सकाळी 11 वाजता नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन आयोजिली आहे. निवडणूकपूर्व अर्थसंकल्पात सातारकरांच्या माथी कोणतीही करवाढ मारण्यात आली नसल्याची माहिती मिळत आहे. 

कोरोना व इतर कारणांमुळे करवसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात अडचणी आल्याने 2019 -2020 या काळाचे पालिकेचे उत्पन्न 245 कोटींवरून 212 कोटी इतके घटले होते. गेल्या सप्टेंबर महिन्यात झालेल्या हद्दवाढीमुळे शाहूपुरी, विलासपूर, शाहूनगर, पिरवाडीसह परिसरातील उपनगरे पालिकेत सामील झाली. हद्दवाढीमुळे पालिकेत आलेल्या ग्रामपंचायती व इतर भागातील एकत्रित उत्पन्नामुळे 2020- 2021 या वर्षासाठीचा पालिकेचा अर्थसंकल्प 298 कोटी 66 लाख 66 हजार रुपयांच्या घरात जाऊन पोचला आहे. प्रथेप्रमाणे हा अर्थसंकल्प उपाध्यक्ष मनोज शेंडे हे सभागृहापुढे सादर करतील. हा अर्थसंकल्प निवडणूकपूर्व असल्याने मतांवर नजर ठेवत सातारकरांच्या माथी यंदा कोणतीही करवाढ मारण्यात आली नाही. अर्थसंकल्प तयार करण्याचे काम स्थायी समितीच्या देखरेखीखाली गेले महिनाभर सुरू होते. स्थायी समितीच्या सहा बैठकांमध्ये भांडवली खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळ घालत अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. 

उंब्रजमध्ये महामार्गावर चक्क वाहनतळ; पोलिस प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

हद्दवाढीमुळे पालिकेत आलेल्या भागातील आरोग्य, पाणी, वीज, रस्ते व इतर पायाभूत सुविधांसाठी 30 कोटींची कामे अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती पालिकेतून मिळाली. याचबरोबर चालू आर्थिक वर्षात केंद्र, राज्य सरकारकडून मिळणाऱ्या निधीतील कामांसाठीची विभागणी करण्यात आली आहे. मूळ शहर आणि हद्दवाढीनंतर पालिकेत आलेल्या भागाच्या सर्वांगीण विकासाचे प्रतिबिंब या अर्थसंकल्पात उमटले असल्याची प्रतिक्रिया काही पदाधिकाऱ्यांनी दिली. अर्थसंकल्पीय सभा ऑनलाइन होणार असून, त्यासाठीची तांत्रिक तयारी पालिकेकडून सुरू असून, या सभेकडे सातारकरांचे लक्ष लागून राहिले आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे