डोंगरात धावत जावून बच्चे कंपनीने रोखला वनहद्दीत घुसणारा वणवा; बोर्गेवाडीतील छोट्यांची मोठी कामगिरी

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News

ढेबेवाडी (जि. सातारा) : डोंगरात लागलेला वणवा चिमुकल्यांनी एक-दीड किलोमीटर धावत पळत जावून वनहद्दीपासून अवघ्या दोन फुटांवर रोखला. कुंभारगाव विभागातील बोर्गेवाडी-चाळकेवाडी दरम्यान काल सायंकाळी घडलेल्या या घटनेतून वणव्यांपासून वनरक्षणाची भावना मोठ्यांबरोबर बच्चे कंपनीतही रुजायला लागल्याचे दिसून येत आहे. 

वनक्षेत्राला लागूनच असलेल्या मालकी क्षेत्रात लावण्यात येणाऱ्या वणव्यांमुळे येथे वन विभागाची डोकेदुखी वाढली आहे. प्रबोधन व जनजागृतीतून अलीकडे ही समस्या हळूहळू कमी होत चालली असली तरी पूर्णपणे संपलेली नाही. वणवे रोखण्यासाठी आता वनकर्मचाऱ्यांच्या मदतीला जागरूक नागरिकही पुढे येत असल्याचे अनेक घटनांतून समोर येत असून त्यामध्ये बच्चे कंपनीही मागे राहिलेली नाही. काल कुंभारगाव विभागात त्याचा प्रत्यय आला. तेथील बोर्गेवाडी-चाळकेवाडी दरम्यान असलेल्या डोंगरातील मालकी क्षेत्रात लागलेला वणवा एक-दीड किलोमीटरवरील तलावाकाठी खेळणाऱ्या मुलांनी पाहिला व क्षणाचाही विलंब न लावता धावत-पळत ते ठिकाण गाठले. तेथे पोचल्यावर त्यांनी निरगुड्यांसह अन्य झाडांच्या डहाळ्यांच्या साह्याने वणवा विझविला. 

वनहद्दीपासून अवघ्या दोन फुटांवर वणवा रोखण्यात यश आल्याने संभाव्य मोठी हानी टळली आहे. घटनास्थळी प्रकाश बोर्गे, बाजीराव मोरे हे ग्रामस्थही उपस्थित होते. त्यांनी मुलांना मार्गदर्शन केले. या प्रकाराबाबत समजताच वनपाल सुभाष राऊत, वनरक्षक सुभाष पाटील व त्यांचे सहकारी अनिल पाटील, दादा मदने ब्लोअर मशिन घेऊन तत्काळ घटनास्थळी पोचले. परंतु, तत्पूर्वीच बच्चे कंपनीने त्यांचे काम संपवून टाकलेले होते. शाळकरी मुलांमध्ये निर्माण झालेल्या पर्यावरणविषयक जागरूकतेबद्दल वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी त्यांचे कौतुक करून पाठीवर शाबासकीची थाप टाकली. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com