esakal | गुढीपाडव्याचा सण साध्या पद्धतीने साजरा करा; जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

जिल्ह्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता संसर्ग रोखण्यासाठी उद्या (मंगळवार) होणारा गुढीपाडव्याचा सण साध्या पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

गुढीपाडव्याचा सण साध्या पद्धतीने साजरा करा; जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन
sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : जिल्ह्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता संसर्ग रोखण्यासाठी उद्या (मंगळवार) होणारा गुढीपाडव्याचा सण साध्या पद्धतीने साजरा करावा. कोणत्याही प्रकारच्या पालखी, दिंडी, प्रभात फेरी, बाईक रॅली व मिरवणुका काढण्यात येऊ नयेत, तसेच पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र न येता घरातच गुढी उभारून साध्या पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे. 

जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा एक हजारांवर गेला आहे. या पार्श्‍वभूमीवर उद्या (मंगळवारी) होणारा गुढीपाडव्याचा सण साध्या पद्धतीने साजरा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून सण, उत्सव साध्या पद्धतीने साजरे करत आहोत. आता गेल्या वर्षीपेक्षा जास्त रुग्णसंख्या सापडू लागली आहे. त्यामुळे गुढीपाडव्याचा सण साध्या पद्धतीने सकाळी सात ते सायंकाळी आठपर्यंत साजरा करावा. काही ठिकाणी पारंपरिक पोषाख करून सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करून नवीन वर्ष म्हणून साजरा करण्यात येतो. 

जिवलग मित्रासाठी एकवटले मैत्रीचे जग; Whatsappच्या माध्यमातून गोळा केला तब्बल अडीच लाखांचा निधी

मात्र, कोरोनाचा वाढलेला संसर्ग लक्षात घेऊन पालखी, दिंडी, प्रभात फेरी, बाईक रॅली व मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी घरगुती गुढी उभारून सण साजरा करावा. प्रशासनाच्या पूर्वसंमतीने आरोग्यविषयक उपक्रम व शिबिरे साजरी करता येतील. यामध्ये मलेरिया, डेंगी, कोरोना, आदी आजार आणि प्रतिबंधात्मक उपाय, तसेच स्वच्छताविषयक जनजागृती करता येईल. त्यामुळे जिल्हा प्रशासन व शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून अत्यंत साध्या पद्धतीने नागरिकांनी गुढीपाडवा सण साजरा करावा, अशी सूचनाही जिल्हाधिकारी सिंह यांनी केली आहे. 

धक्कादायक! खटाव तालुक्यात बेड शिल्लक नसल्याने महिलेवर रिक्षातच उपचार करण्याची वेळ

Covid Vaccine च्या सुरक्षिततेसाठी डीप फ्रीजरची गरज; गटनेते राजेंद्र यादवांची प्रशासनाकडे मागणी 

संपादन : बाळकृष्ण मधाळे