
तारळे (जि. सातारा) : सध्या जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या रणधुमाळीने वेग घेतला आहे. उमेदवारी अर्ज भरणाऱ्यांची लगबग वाढली आहे. कागदपत्रांची जुळवाजुळव व ऑनलाइन अर्ज व त्यासाठीच्या पूर्तता आदींसाठी उमेदवार व नेत्यांची धावपळ उडालेली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने ग्रामपंचायतींच्या महसुलात भरघोस वाढ झाली आहे. तारळ्यात एका आठवड्यात साडेचार लाख एवढा घरपट्टी व पाणीपट्टीतून महसूल जमा झाला आहे.
कोरोना महामारीने जगभर धुमाकूळ घातला असून, अजूनही तो सुरूच आहे. आपल्याकडे मात्र रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. लॉकडाउनचा सामना करावा लागल्याने सर्वांची आर्थिक स्थिती कोलमडली होती. त्यातून ग्रामपंचायतीदेखील सुटल्या नाहीत. लोकांची आर्थिक स्थिती खालावल्याने लोकांनी कर भरण्याकडे साफ दुर्लक्ष केले होते. परिणामी, अनेक ग्रामपंचायतींच्या कारभारावर विपरित परिणाम झाला होता. कर्मचाऱ्यांना पगार देण्याइतपतदेखील पैसे ग्रामपंचायतींकडे आले नाहीत. शिवाय विकासकामे देखील रखडली होती. दरम्यान, मार्च ते डिसेंबरअखेर मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला आयोगाने संमती दिल्याने राजकीय हालचाली गतिमान झाल्या.
23 तारखेपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली. अर्ज भरताना अनेक घोषणापत्रे, शपथपत्रे भरावे लागत आहेत. यातील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ग्रामपंचायतीची थकबाकी नसल्याचा दाखला होय. त्यासाठी उमेदवाराला आपली घरपट्टी व पाणीपट्टी भरून हा दाखला घ्यावा लागतो. त्यामुळे ग्रामपंचायतीकडे कर भरणाऱ्यांची रांग लागली आहे. अनेकांचा एक ते दोन तीन वर्षांचा कर भरणा यानिमित्ताने झाला. या भरण्याचा मेटाकुटीला आलेल्या ग्रामपंचायतींना हातभार लागला आहे. तारळ्यातदेखील 30 तारखेअखेर सुमारे 53 जणांनी अर्ज भरले आहेत, तर ग्रामपंचायतीमध्ये 70 जणांनी ग्रामपंचायत कर भरला. यातून भरलेल्या कराची रक्कम सुमारे साडेचार लाख झाल्याची माहिती मिळत आहे. यानिमित्ताने रखडलेली वसुली सुरू झाल्याचे दिसून येत आहे. याचा अडचणीत आलेल्या ग्रामपंचायतीचा कारभार पूर्वपदावर येण्यास मदतच होणार आहे.
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.