वाटाघाटीने मार्ग निघत नसेल, तर लोहमार्गासाठी जमिनी सक्तीने ताब्यात घ्या; खासदारांचे सक्त आदेश

Satara Latest Marathi News Satara News
Satara Latest Marathi News Satara News

फलटण शहर (जि. सातारा) : फलटण-बारामती लोहमार्गासाठी वाटाघाटीने मार्ग निघण्यात अडचणी येत असतील व जमीन अधिग्रहणासाठी वेळ वाया जाणार असेल तर या जमिनी सक्तीने भूसंपादन करून ताब्यात घ्याव्यात. लोहमार्गाचे प्रलंबित काम त्वरित सुरू करावे, असे निर्देश खासदार तथा सोलापूर विभागीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष रणजितसिंह निंबाळकर यांनी दिले. 

येथील तहसील कार्यालयात फलटण-बारामती व फलटण-लोणंद लोहमार्गाच्या अडचणीबाबत रेल्वे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आयोजित आढावा बैठकीत खासदार निंबाळकर बोलत होते. या वेळी रेल्वे पुणे विभाग व्यवस्थापक रेणू शर्मा, सहायक व्यवस्थापक जे. सी. गुप्ता, सहायक व्यवस्थापक योगेंद्रसिंह बैस, फलटणचे प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप, बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, कोरेगावच्या प्रांताधिकारी ज्योती पाटील, फलटणचे तहसीलदार समीर यादव, रेल्वेचे अधिकारी जी. श्रीनिवास, राजेंद्र कुलकर्णी, सतीश कोंडलकर, मुख्य नियंत्रक एम. के. सिंबीयन, मनोरंजन कुमार, युवा नेते अभिजित निंबाळकर, सुरवडीचे सरपंच जितेंद्र साळुंखे-पाटील, सुनील यादव आदी उपस्थित होते. 

फलटण-बारामती लोहमार्ग 37 किलोमीटर लांबीचा आहे. त्यामध्ये बारामती तालुक्‍यातील 13 व फलटण तालुक्‍यातील तीन गावांतील जमिनींचे भूसंपादन करावे लागणार आहे. भूसंपादन प्रक्रियेसाठी बारामती तालुक्‍याला 115 कोटी व फलटण तालुक्‍याला 15 कोटी रुपये उपलब्ध करून दिल्याचे व्यवस्थापक रेणू शर्मा यांनी स्पष्ट केले. फलटण-लोणंद लोहमार्गाचे भूसंपादन करताना काही शेतकऱ्यांचे केवळ 1 ते 3 गुंठे क्षेत्र शिल्लक राहात आहे. ते वहिवाटणे संबंधित शेतकऱ्यांना फायदेशीर नसल्याने रेल्वेने या शिल्लक क्षेत्रासह संपूर्ण क्षेत्राचे भूसंपादन करावे, अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे. या मागणीवर सकारात्मक निर्णय घेण्याबाबत खासदार निंबाळकर यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले. 

फलटण-पुणे मार्गावर रेल्वे वाहतुकीस मान्यता मिळाल्याने या मार्गावर प्रवासी व मालवाहतूक सुरू होणे अपेक्षित आहे. या मार्गावरील दुरुस्ती, रेल्वे गेट, बायपास वगैरे प्रश्नांबाबत तातडीने निर्णय घेऊन संपूर्ण लोहमार्ग वाहतूकयोग्य होईल, यासाठी नियोजन करावे, अशा सूचना निंबाळकर यांनी केल्या. या मार्गावरील सर्व गेट स्वयंचलित करावीत, अंडर पासेस ठिकाणी रस्ते सुस्थितीत राहतील, रस्त्यावर पावसाळ्यात पाणी साठल्याने वाहतूक ठप्प होणार नाही, यासाठी योग्य व्यवस्था करावी तसेच फलटण रेल्वे स्टेशनची अपूर्ण कामे पूर्ण करावीत, दुरुस्ती असेल तर ती तातडीने करावी आणि स्टेशन इमारतीची मोडतोड, नासधूस टाळण्यासाठी तेथे सुरक्षा रक्षक नियुक्त करावेत, अशा सूचना निंबाळकर यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्या. 

आदर्की रेल्वे स्टेशन गावापासून किंबहुना लोकवस्तीपासून दूर असून, या स्टेशनवर उतरून घराकडे जाणाऱ्या किंवा स्टेशनवर येणाऱ्या प्रवाशांना सात किलोमीटर चालत जावे व यावे लागते. हे स्टेशन आदर्की गावाजवळ स्थलांतरित करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत लवकर तोडगा काढण्याचे आदेश खासदार निंबाळकर यांनी दिले. स्टेशन स्थलांतरित करणे शक्‍य नाही. त्यापेक्षा तेथे जाण्यासाठी रस्ता करणे सोईस्कर होईल. त्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन रेल्वे अधिकाऱ्यांनी या वेळी दिले. वाठार स्टेशन येथे शेतमाल वाहतुकीची व्यवस्था, लोहमार्गाच्या विस्तारीकरणामुळे पिंपोडे येथील रेल्वे गेट बंद झाल्याने तेथे पर्यायी मार्ग काढण्यासाठी सूचना देऊन त्यासाठी आवश्‍यक निधी रेल्वे बोर्डाकडून मंजूर करून आणण्याचे आश्वासन खासदार निंबाळकर यांनी दिले. या बैठकीनंतर वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी खासदार निंबाळकर यांच्यासमवेत फलटण व सुरवडी रेल्वे स्टेशन, रेल्वे गेट, बायपास आदींची जागेवर जाऊन पाहणी केली. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com