VIDEO : मैत्रीच्या विश्वासावर निवडणूक ठामपणे लढवली आणि जिंकलीही : श्रीनिवास पाटील

बाळकृष्ण मधाळे
Sunday, 18 October 2020

योगायोगाने विधानसभा निवडणुकीसोबत सातारा लोकसभेची पोटनिवडणूक लागली होती. सातारा मतदारसंघातून तीनवेळा निवडून आलेले बलाढ्य उमेदवार समोर होते. त्यांच्या समोर राष्ट्रवादीने कोणाला उभे करायचे हा प्रश्न निर्माण झाला होता. पवार साहेबांचा मला आदेश आला. या बिकटसमयी बाकी काही विचार न करता फक्त साहेबांच्या मागे मी ठामपणे उभा राहिलो आणि त्याच एका भूमिकेतून मी हे आव्हान स्वीकारले, असे खासदार श्रीनिवास पाटील यांनी आजच्या ऐतिहासिक दिवसाच्या पार्श्वभूमीवर काही खिस्से सांगितले.

सातारा : नव्वदीच्या उंबरठ्यावर असलेल्या खासदार श्रीनिवास पाटील यांनी शरद पवारांच्या हाकेला होकार दिला. साताऱ्याचा निकाल फिरवला गेला तो प्रचाराच्या शेवटच्या दिवशी! पवारांनी भर पावसात भाषण केले. पण, उदयनराजेंविरोधात उभे राहताना पाटील यांनी जय-पराजयाचा विचार केला नव्हता. समोर पराभव दिसत होता. पण, त्यांनी सहा दशकांच्या मैत्रीखातर पवारांच्या एका शब्दावर खांद्याला खांदा लावून निवडणूक लढविली आणि जिंकलीसुध्दा! यात राजकारण हरले, पण मैत्री जिंकली अशीच भावना सातारकरांच्या मनामध्ये आजही कायम आहे. अवघ्या चार महिन्यांत राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये दाखल झालेल्या उदयनराजेंविरोधात राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी जोरदार लढत दिली आणि साताऱ्याची जागा खेचून आणली. उदयनराजेंचा लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये मोठ्या फरकाने पराभव झाला. 

दिनांक १८ ऑक्टोबर २०१९... महाराष्ट्र विधानसभा व सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी झालेल्या सातारा येथील पावसातील 'त्या' सभेच्या आठवणी आजही तशाच ताज्या आहेत. रात्री उशिरा झालेल्या सभेवेळी पावसाची भुरभूर सुरु झाली होती. त्यामुळे उपस्थित लोकांना शंका होती की, पवार साहेब बोलतील का नाही? पवार साहेब व्यासपीठावर गेल्याबरोबर पावसाची धो-धो बरसात सुरु झाली. मात्र, साहेबांनी पुढे येऊन केलेल्या आपल्या ओघवती भाषेत दहा ते पंधरा मिनिटे भाषण करून कोणत्याही परिस्थितीत आपण सर्वांनी राष्ट्रवादीच्या मागे उभे राहिले पाहिजे, हे आवाहन मतदारांना केले. त्यातून मतदार आणि जमलेल्या जनसमुदायामध्ये चैतन्य संचारले. यावेळी कोणीही जागचे हलले नाही. गेल्या साठ वर्षामध्ये ज्यांची- माझी मैत्री होती, त्या एका कर्तबगार पुरुषाच्या मागे सातारा जिल्हा किती ठामपणे उभा आहे याची प्रचिती त्या दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आली.

तेरी मेरी यारी 60 वर्षांनंतरही लय भारी

ऑक्टोबर २०१९ ला महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पार पडली. ही निवडणूक देशातील एक ऐतिहासिक निवडणूक ठरली. मे'मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीचे ओपिनियन पोल, मीडिया रिपोर्ट यांनी निर्माण केलेल्या वातावरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत सर्वजण साशंक होते. राष्ट्रवादीचे जहाज बुडणार असे समजून अनेकजण ऐनवेळी सोडून गेले होते. अशा परिस्थितीत केवळ एकजण आत्मविश्वास दाखवून ठामपणे उभे होते ते म्हणजे, शरद पवार साहेब! योगायोगाने विधानसभा निवडणुकीसोबत सातारा लोकसभेची पोटनिवडणूक लागली होती. या मतदारसंघातून तीनवेळा निवडून आलेले बलाढ्य उमेदवार समोर होते. त्यांच्या समोर राष्ट्रवादीने कोणाला उभे करायचे हा प्रश्न निर्माण झाला होता. पवार साहेबांचा मला आदेश आला. या बिकटसमयी बाकी काही विचार न करता फक्त साहेबांच्या मागे मी ठामपणे उभा राहिलो आणि त्याच एका भूमिकेतून मी हे आव्हान स्वीकारले, असे खासदार श्रीनिवास पाटील यांनी सांगितले.

जो बत्ती करतो गुल, तो नेता पावरफुल्ल!

ते पुढे सांगताना म्हणाले, भाजपाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. प्रधान मंत्री नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रचाराच्या सभा सातारा व कराड येथे झाल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर पवार साहेबांची एक सभा '१८ ऑक्टोबर'ला सातारा येथे ठरली. पाटण तालुक्यातील मल्हारपेठ येथे सायंकाळी आमची सभा चालली होती. पावसाची भुरभूर सुरु झाली होती. त्यानंतर साताराला पोहचायला आम्हाला उशीर झाला. पवार साहेब व्यासपीठावर गेल्याबरोबर पावसाची धो-धो बरसात सुरु झाली. मात्र, तशा वातावरणातही पवार साहेबांनी सभेला संबोधित केले. त्यास लाखोंच्या जनसमुदयाने दिलेला प्रतिसाद अचंबित करणारा होता. गेल्या साठ वर्षामध्ये ज्यांची-माझी मैत्री होती, त्या एका कर्तबगार पुरुषाच्या मागे सातारा जिल्हा किती ठामपणे उभा आहे याची कल्पना त्या दहा मिनिटांमध्ये आली. त्या क्षणी भारावलेल्या वातावरणात माझी भावना एवढीच होती की, आपण आपल्या नेत्याच्या, मित्राच्या हाकेला पुन्हा एकदा ओ देऊन उभे राहिलो आहोत. आपला नेता कोसळणाऱ्या पावसात देखील ठामपणे उभा आहे. मग निवडणुकीचा निकाल काहीही लागो, असेही त्यांनी ठामपणे विश्वासाने सांगितले. 

Vidhan Sabha 2019 : धो धो पावसात भिजत शरद पवारांचे साताऱ्यात घणाघाती भाषण (व्हिडिओ)

सातारा जिल्ह्याची लढाऊ वृत्ती, पुरोगामी परंपरा, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची शिकवण याचे आम्ही पालन मनापासून युवक काँग्रेस काळापासून करत आलो. हाच माझ्यासाठी आनंदाचा दिवस होता. त्यावेळी मी चिंब भिजलो, फक्त पावसात नव्हे तर सातारकर जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या प्रेमात. पवार साहेब आणि आमच्यात गेली साठ वर्षे स्नेह होता, त्याची जोपासना आम्ही आयुष्यभर केली. स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या स्मृतीला वंदन करून ठामपणे ही निवडणूक लढवली. जनतेनेही आमच्या पदरात यशाचे सूप भरभरून ओतले, असेही पाटील यांनी शेवटी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News MP Shrinivas Patil Memories Of Sharad Pawar Rally In Satara