ग्रेड सेपरेटरनंतर महामार्गावरील उड्डाण पुलाचे नामकरण; उदयनराजे समर्थकांचा प्रशासनाला आणखी एक दणका

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News

सातारा : खासदार उदयनराजे भोसले  (Udayanraje Bhosale) हे सध्या आक्रमक झालेले असून सातारा पालिकेच्या होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विकासकामांवर जास्त लक्ष केंद्रीत केले आहे. ग्रेड सेपरेटरच्या उद्‌घाटनावेळी त्यांनी सर्व भुयारी मार्गांना थोर व्यक्तींची नावे दिली. आता त्यापुढे जाऊन बॉम्बे चौकातील महामार्गावरील उड्डाण पुलालाही 'श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज ऊर्फ दादा महाराज उड्डाणपूल' असे नामकरण करून प्रशासनासह सातारकरांना उदयनराजे समर्थकांनी आणखी एक धक्का दिला आहे.

सध्या ग्रेड सेपरेटरच्या उद्‌घाटनावर भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि जिल्हा प्रशासन असे शित युध्द सुरू आहे. उदयनराजेंनी ग्रेड सेपरेटरची (Grade Separator) पहाणी करण्याच्या निमित्ताने थेट उद्‌घाटन करून तो सातारकरांसाठी खुला केला. यावेळी त्यांनी ग्रेड सेपरेटरच्या भुयारी मार्गाच्या चारही प्रवेशाच्या ठिकाणांना चार थोर व्यक्तींची नावे दिली. यामध्ये श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज भुयारी मार्ग, छत्रपती संभाजी महाराज भुयारी मार्ग, श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) भुयारी मार्ग अशी नावे दिलेले फलकही लावले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी छत्रपती संभाजी महाराज भुयारी मार्गाला लावलेला फलक फाटला. यामागे घातपात असल्याचे कारण पुढे करून उदयनराजे समर्थक आक्रमक झाले. त्यामुळे साताऱ्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून सदर फलक हटविला, तसेच उदयनराजे समर्थकांनी त्या जागी नवीन फलक लावला. तर पोलिसांनी फाटलेल्या फलकाचा तपास करून तो वाऱ्याने फाटल्याचा निष्कर्ष सांगितला. त्यामुळे तणाव निवळला. तोपर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहात आले व त्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी बंद खोलीत चर्चा केली. त्यामुळे अनेक चर्चेला उधाण आले होते. 

हा विषय ताजा असतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रेड सेपरेटरचे शासकीय उद्‌घाटन होणार असल्याचे जाहीर करत याची जबाबदारी बांधकाम विभागावर दिल्याचे सांगितले. तसेच ग्रेड सेपरेटरमधून प्रवास करणाऱ्या प्रत्येक नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची असल्याचे सांगितले. त्यानंतर उदयनराजेंनी पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांसमवेत ग्रेड सेपरेटरची पहाणी केली. तसेच सातारा शासकीय मेडिकलक कॉलेजच्या जागेचीही पहाणी केली. त्यावेळी उदयनराजेंना ग्रेड सेपरेटरच्या दुसऱ्यांदा होणाऱ्या उद्‌घाटनावरून पत्रकारांनी छेडले. त्यावेळी त्यांनी प्रशासन व राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीकेची झोड उठविली. विकास कामे होऊन उद्‌घाटनाची आम्ही वाट पहायची का, असा प्रश्न उपस्थित करून मेडिकल कॉलेजचेही उद्‌घाटन होणार असे सांगत कोण आडवं आलं तर आडवं करणार, असा सूचक दमही त्यांनी भरला. तर उद्‌घाटनासाठी गर्दी जमविणे, शासकीय कामांचे उद्‌घाटन करणे, याविरोधात कोणीही तक्रार केलेली नाही, त्यामुळे गुन्हा दाखल करण्याचा प्रश्नच येत नसल्याचे सांगत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी उदयनराजेंची पाठराखण केली होती.  

काल (मंगळवारी) नियोजन समितीच्या बैठकीच्या निमित्ताने पालकमंत्री साताऱ्यात आले होते. त्यांनी यावेळी ग्रेड सेपरेटरचे प्रजासत्ताक दिनी शासकीय उद्‌घाटन होणार असल्याचे जाहीर करून ग्रेड सेपरेटरच्या वादात ठिणगी टाकली. तर आज सकाळी उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी साताऱ्यातील बॉम्बे चौकातील महामार्गावरील उड्डाण पुलाला श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज उर्फ दादा महाराज उड्डाणपूल असे नामकरण करणारा फलक लावला आहे. उदयनराजेंच्या समर्थकांनी सातारकरांसह जिल्हा प्रशासनाला आणखी एक धक्का दिला आहे. त्यामुळे ग्रेड सेपरेटरवरून सुरू झालेला उदयनराजे भोसले व त्यांचे समर्थक विरूध्द जिल्हा प्रशासन आणि राष्ट्रवादीचे नेत्यातील वाद आता आणखी पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com