नेर कालव्याची दुरुस्ती युद्धपातळीवर; शेतकऱ्यांचे पाण्याअभावी टळणार नुकसान

ऋषिकेश पवार
Tuesday, 22 December 2020

खटाव तालुक्‍यातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेल्या नेर तलावाच्या मुख्य कालव्याला पडलेल्या मोठ्या भागदाडाची व पाण्याच्या प्रवाहाने झालेल्या नुकसानीची "सकाळ'ने प्रत्यक्ष पाहणी करून बातमी प्रसिद्ध केली होती, तसेच कॅनॉल दुरुस्ती देखभालीची कामे होत नसल्याने लाभक्षेत्रातील रब्बी पिकांच्या होणाऱ्या नुकसानीवर प्रकाश टाकला होता.

विसापूर (जि. सातारा) : 'सकाळ'ने "नेर कालव्याला भगदाड' या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून कालव्याच्या दुरुस्तीची मागणी केली होती, तसेच कालव्याची तातडीने दुरुस्ती करून रब्बी पिकांना पाणी उपलब्ध करावे, यासाठी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख प्रताप जाधव यांनीदेखील आंदोलन केले होते. त्याची दखल पाटबंधारे विभागाने घेत नेर कालवा दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. 

खटाव तालुक्‍यातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेल्या नेर तलावाच्या मुख्य कालव्याला पडलेल्या मोठ्या भागदाडाची व पाण्याच्या प्रवाहाने झालेल्या नुकसानीची "सकाळ'ने प्रत्यक्ष पाहणी करून बातमी प्रसिद्ध केली होती, तसेच कॅनॉल दुरुस्ती देखभालीची कामे होत नसल्याने लाभक्षेत्रातील रब्बी पिकांच्या होणाऱ्या नुकसानीवर प्रकाश टाकला होता. सद्यःस्थितीत, कालव्याद्वारे ओलिताखाली येणाऱ्या क्षेत्रातील रब्बी पिकांना पाण्याची गरज आहे. पाटबंधारे विभागाने तातडीने काम सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांचे पाण्याअभावी होणारे नुकसान टळणार आहे. याबद्दल शेतकरी वर्गाने आनंद व्यक्त केला असून, दै. "सकाळ'चे आभार मानले आहेत. 

अफझल खान कबर परिसर पर्यटकांसाठी खुला करा; माजी आमदाराची प्रशासनाकडे मागणी

या दुरुस्तीमुळे गळतीलाही मोठ्या प्रमाणात लगाम बसणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. नेर कालव्याची दुरुस्ती सुरू झाल्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकरी आनंदीत आहेत. मात्र, कॅनॉल दुरुस्ती, देखभालीची कामे वेळेत होत नसल्याने दर वर्षी असे प्रकार घडत असून, प्रशासनाच्या नियोजन शून्यतेमूळे शेतकरी संकटात सापडतात. भविष्यात ही परिस्थिती उद्‌भवू नये, यासाठी दुरुस्ती, देखभालीची कामे वेळेतच करण्याची गरज आहे, असे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव यांनी नमूद केले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News Ner Canal Repair Work Started