Satara Latest Marathi News Satara News
Satara Latest Marathi News Satara News

तरसवाडीतील घाट माथ्यावर वनराईला वणवा; 100 एकर वनराई जळून खाक

Published on

मायणी (जि. सातारा) : तरसवाडी (ता. खटाव) येथील घाट माथ्यावर वणवा लागून तेथील शेकडो एकरांवरील वनराई आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. वनविभागाच्या निष्काळजीपणा व मनमानी कारभारामुळे मोठे नुकसान झाल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. 

तरसवाडीच्या पश्‍चिमेला डोंगररांग असून, सुमारे दोन किलोमीटरचा चढणी व उतरणीचा तरसवाडी घाट आहे. तेथील घाटमाथ्यावर लोकांच्या खासगी मालकीच्या जमिनी आणि वन क्षेत्रही आहे. घाटमाथ्यावर व परिसरात गेल्या दोन वर्षांत जलसंधारणाची कामे झाल्याने ठिकठिकाणी वृक्षारोपण केले आहे. आधीच पर्जन्यमान कमी असल्यामुळे, ओसाड व उजाड असलेल्या घाटमाथ्यावर वनराई फुलवण्याचे काम तरसवाडी, मुळीकवाडी व पाचवडचे नागरिक करीत आहेत. मात्र, वनांचे रक्षण व संवर्धन करण्याचे ज्यांचे काम आहे. त्या वनविभागाचे घाटमाथ्यावरील वन संवर्धनाकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. 

खटाव व माण तालुक्‍यांच्या सीमेवरील कुकुडवाड खिंडीपासून ते तरसवाडी (जळकी) दरम्यान दहा किलोमीटर लांबीच्या डोंगर माथ्यावर दर वर्षी हमखास वणवा लागत असतो. कधी तिथे उभारण्यात आलेल्या पवनचक्‍क्‍यांद्वारे निर्माण झालेल्या विजेच्या ठिणग्या पडून, तर कधी अज्ञात व्यक्तींकडून वणवा पेटत असतो. त्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून वेळीच जाळ रेषा काढण्याचे काम वनविभागाकडून केले जात नाही. जाळ रेषा सर्वत्र काढल्या जात नाहीत. काढल्या तर त्याही कमी प्रमाणात. अनेक कामे निव्वळ कागदोपत्री केली जातात. मात्र, प्रत्यक्ष काम केलेले दिसत नाही, असा आरोप नागरिक करीत आहेत. 

दरम्यान, नुकताच लागलेला वणवा स्थानिक लोक व वन विभागाचे कर्मचारी यांनी तब्बल पाच तास प्रयत्नांची शिकस्त करून विझवला, तरीही शेकडो झाडेझुडपे आगीने होरपळून गेली आहेत. जनावरांच्या चाऱ्यासाठी कापून ठेवलेले गवत संपूर्ण जळून गेले आहे. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. कोणाच्या निष्काळजीपणामुळे वणवा लागला याची चौकशी करून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, केवळ वनविभागाच्या निष्काळजीपणामुळे प्रतिवर्षी घाट माथ्यावरील वनराई जळून जाते. लेखी निवेदन देऊनही अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करतात, असे तरसवाडीतील सामाजिक कार्यकर्ते गोरख पवार यांनी सांगितले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com