
चाफळ विभागातील आठपैकी सहा ग्रामपंचायतींच्या निवडणुका चुरशीने होत आहेत, तर दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.
चाफळ (जि. सातारा) : विभागातील आठपैकी सहा ग्रामपंचायतींच्या निवडणुका चुरशीने होत आहेत, तर दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. पाटणकर-देसाई गटांकडून मोर्चेबांधणी सुरू असून, त्यांच्यात कडवी झुंज आहे. आठपैकी पाच ग्रामपंचायतींवर देसाई गटाची तर तीन ग्रामपंचायतींवर पाटणकर गटाची सत्ता आहे. त्यामुळे ऐन थंडीच्या कडाक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण तापले आहे.
विभागातील वाघजाईवाडी, विरेवाडीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. दोन्हीवर पाटणकर गटाची सत्ता आहे. त्याशिवाय चव्हाणवाडी, केळोली, शिंगणवाडी, खोनोली, पाठवडे, कोचरेवाडी या ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होत आहेत. त्यात चव्हाणवाडी, केळोली, शिंगणवाडी, खोनोली व पाठवडे ग्रामपंचायती देसाई तर कोचरेवाडी ग्रामपंचायतीत पाटणकर गटाची सत्ता आहे. सहा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. विभागातील पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत पाटणकर गटाकडून देसाई गटावर 1700 मताधिक्य होते.
शिखर शिंगणापुरात चौरंगी लढत; राजकीय वर्चस्वासाठी मातब्बर उमेदवारांत चुरस
विधानसभा निवडणुकीत कमी करून देसाई गटाने 35 मतांचे मताधिक्य घेतले होते. त्यामुळे मागील निवडणुकीचा विचार करता दोन्ही गट विभागात समसमान आहेत. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी दोन्ही गटाकडून जोरदार मोर्चेबांधणीला वेग आला आहे. सरपंचपद निवडून येणाऱ्या सदस्यातून निवडला जाणार आहे. देसाई व पाटणकर गटांनी विकासकामावर जोर देत प्रचाराचा सपाटा लावला आहे. देसाई गटाकडून पॅनेलप्रमुखांसह जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डी. वाय. पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष भरत साळुंखे, कारखान्याचे उपाध्यक्ष राजाराम पाटील, शिवदौलतचे संचालक चंद्रकांत पाटील रणनीती आखत आहेत. पाटणकर गटाकडून शिक्षण व अर्थ समितीचे माजी सभापती राजेश पवार व त्यांचे सहकारी मंडळी डावपेच आखत आहेत.
चोपडी, मुळगावात गृहराज्यमंत्री सत्ता अबाधित राखणार?; राष्ट्रवादीलाही सत्तांतराची संधी
आश्वासनांची आमिषेही..
चाफळ विभागातील गट व गणातील आठ ग्रामपंचायतींत राजकीय नेते सक्रिय आहेत. थेट निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायती ताब्यात ठेवण्यासाठी सत्ताधारी तर सत्ता पालटासाठी विरोधक सज्ज आहेत. त्यांची मोर्चेबांधणी जोरदार आहे. त्यामुळे सामना अटीतटीचा आहे. त्यादृष्टीने मतदारांना अनेक आश्वासने व आमिषे दाखवली जात आहेत.
संपादन : बाळकृष्ण मधाळे