
यंदा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला विविध योजनांसाठी मार्च महिन्यापासून 13 कोटी 63 लाखांचा निधी आला होता.
सातारा : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने कोरोनाच्या काळात खोळंबलेल्या योजना मार्गी लावण्यासाठी यंदा मार्च महिन्यापासून 11 कोटी 28 लाख निधी खर्च केला आहे. यामधून जिल्ह्यात मार्च ते डिसेंबर या कालावधीत 154 गावांत जलजीवन मिशन योजनेंतर्गत नळजोडणी पूर्ण झालेल्या आहेत.
यंदा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला विविध योजनांसाठी मार्च महिन्यापासून 13 कोटी 63 लाखांचा निधी आला होता. मात्र, कोरोनाच्या काळात मार्च महिन्यापासून लॉकडाउन सुरू झाल्याने गावोगावी सुरू असलेल्या जलजीवन मिशन योजना व इतर ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्यांची विविध कामे अपूर्ण राहिली होती. काही गावांमध्ये नळजोडणीअभावी पाण्याची गैरसोय झाली होती. अनेक ठिकाणी नळजोडणीची कामे अर्धवट राहिली होती. कोरोनाच्या संकटामुळे विकासकामे खोळंबल्याने मार्च महिन्यापासूनचा अखर्चित निधी मोठ्या प्रमाणात शिल्लक होता. मात्र, सप्टेंबर महिन्यात लॉकडाउन शिथिल केल्यानंतर विविध योजनांसाठी निधी वापरण्यात येत आहे. यामधून ग्रामीण भागामध्ये आतापर्यंत 150 हून अधिक गावांमध्ये जलजीवन मिशन योजनेंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास गेल्या आहेत.
ज्वारी बहरात, हुरडा पार्ट्या जोरात; माण तालुक्यात पक्ष्यांची चंगळ
दरम्यान, जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबीयास दरडोई प्रतिदिवस 55 लिटर पाणी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने ठेवले आहे. ग्रामीण भागात सार्वजनिक शुध्द पाणीपुरवठा, शाश्वत पाणीपुरवठा केला जात आहे. यासाठी मागील वर्षी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागास विविध योजनांसाठी 23 कोटी आठ लाखांचा निधी आलेला होता. या निधीतून गेल्या वर्षी जिल्ह्यातील 59 योजना पूर्णत्वास गेल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने दिली.
दक्षिण मांड नदीवरील 50 वर्षांपूर्वीचा पूल इतिहास जमा; नवीन पुलासाठी सरकारचा प्रयत्न
कोरोनाच्या काळात ग्रामीण भागातील अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण केली जात आहेत. यासाठी यंदा मार्च महिन्यापासून 13 कोटी 63 लाखांचा निधी प्राप्त झाला असून, त्या माध्यमातून योजना पूर्णत्वास नेल्या जात आहेत.
-एस. एस. शिंदे, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग
संपादन : बाळकृष्ण मधाळे