esakal | प्लाझ्मामुळे वाचले शंभर जीव; साता-यात दात्यांची गरज
sakal

बोलून बातमी शोधा

प्लाझ्मामुळे वाचले शंभर जीव; साता-यात दात्यांची गरज

सध्या जिल्हा प्रशासनासह सर्व स्तरातून प्लाझ्मा दान करण्यासाठीचे आवाहन केले जात आहे. त्यालाही अल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी सामाजिक भावनेतून प्लाझ्मा दानाचा संकल्प करणे आवश्‍यक आहे.

प्लाझ्मामुळे वाचले शंभर जीव; साता-यात दात्यांची गरज

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : कोरोना रुग्णांवर उपचारासाठी औषधे, इंजेक्‍शनसोबत प्लाझ्मा थेरपीचाही उपयोग होत आहे. राजस्थानमध्ये सुमारे 200 ते 250 रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीच्या माध्यमातून यशस्वी उपचार केले आहेत. या उपचार पध्दतीचा प्रयोग सातारा जिल्ह्यातही सुरू आहे. आतापर्यंत 100 रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीच्या माध्यमातून उपचार झालेले आहेत. पण, यासाठी प्लाझ्मा दान करण्यासाठी (डोनर) दात्यांनी पुढे येणे गरजेचे आहे. यामध्ये ए, ओ, बी व एबी निगेटिव्ह रक्तगटाचे दाते उपलब्ध होत नसल्याने या उपचार पध्दतीला मर्यादा येऊ लागली आहे.

कोरोना रुग्णांसाठी इतर उपचार पध्दतीसोबतच प्लाझ्मा थेरपी ही वरदान ठरलेली आहे. यामध्ये कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या रक्तातील निर्माण झालेली प्रतिकारशक्ती प्लाझ्माच्या रूपातून काढून घेऊन ती दुसऱ्या त्याच रक्तगटाच्या कोरोनाबाधित गंभीर रुग्णांना देऊन त्यांना कोरोनामुक्त करता येऊ शकते. याबाबत राजस्थान राज्यात या थेरपीचा सर्वाधिक वापर करून रुग्ण कोरोनामुक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यातही कृष्णा व सातारा जिल्हा रुग्णालयात या उपचार पध्दतीने कोरोनाबाधित रुग्ण बरे केले जात आहेत. पण, योग्यवेळी योग्य रक्ताचा दाता (डोनर) मिळणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे या उपचार पध्दतीत मर्यादा येत आहेत. त्यासाठी जिल्हा प्रशासनानेही मध्यंतरी प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन कोरोनातून मुक्त झालेल्या रुग्णांना केले होते. यापैकी काही जणांनी आपला प्लाझ्मा दान करून सुमारे 100 च्यावर रुग्णांना जीवदान दिले आहे. पण, सध्या योग्य रक्तगटाचा दाता मिळणे अवघड झालेले आहे. यामध्ये ए, बी, एबी, ओ निगेटिव्ह रक्तगटाचा दाता अल्प प्रमाणात मिळतो. त्यामुळे या गटाच्या कोरोनाबाधित रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीचा उपचार करताना मर्यादा येत आहे. त्यामुळे अशा रुग्णांवर उपचार करताना प्लाझ्मा दाता उपलब्ध होईल का, याची खात्री नसल्याने अनेकदा इतर उपचार पध्दतीचा वापर करावा लागत आहे. मुळात इतर इंजेक्‍शन व औषधांचा परिणाम कोविड बरा झाल्यानंतर पाहायला मिळत आहे. त्यामुळे हे दुष्परिणाम टाळण्यासाठी प्लाझ्मा थेरपी उपयुक्त ठरत आहे. पण, योग्य प्रमाणात दाता उपलब्ध नसल्याने या थेरपीपुढे मर्यादा येत आहेत.

पुसेगाव, काटकरवाडी परिसरात वाळू चोरट्यांचा धुमाकूळ, पोलिस-महसूलचे दुर्लक्ष 

सातारा जिल्ह्यातील दोन रक्तपेढ्यांना (ब्लड बॅंक) कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांकडून प्लाझ्मा जमा करण्याची परवानगी आहे. यामध्ये अक्षय ब्लड बॅंक व बालाजी ब्लड बॅंकेचा समावेश आहे. तर सातारा जिल्हा रुग्णालय आणि कृष्णा हॉस्पिटलमध्ये प्लाझ्मा जमा केला जातो. तेथून तो कोरोनाबाधित रुग्णांना आवश्‍यकतेप्रमाणे दिला जातो. सध्या एबी, बी, ओ पॉझिटिव्ह रक्तगटाचा प्लाझ्मा उपलब्ध होऊ शकतो. पण, निगेटिव्ह रक्तगटाचा प्लाझ्मा मिळण्यात अडचणी येतात. अशा वेळी दात्यांना आवाहन करूनच असा प्लाझ्मा मिळवावा लागतो. सध्या जिल्हा प्रशासनासह सर्व स्तरातून प्लाझ्मा दान करण्यासाठीचे आवाहन केले जात आहे. त्यालाही अल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी सामाजिक भावनेतून प्लाझ्मा दानाचा संकल्प करणे आवश्‍यक आहे. 

आळंदी- पंढरपूर मोहोळ पालखी महामार्ग नुकसान भरपाईत दिरंगाई, फरांदवाडीत रास्ता रोकोचा इशारा 

""प्लाझ्मा थेरपी उपयुक्त असली तरी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांकडून प्लाझ्मा दान करण्याबाबत जागृती झाली पाहिजे. तसेच कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी कितपत उपयुक्त ठरेल, हेही सांगता येत नाही. प्लाझ्मा थेरपी शेवटचा पर्याय म्हणून पाहिले जात असले तरी योग्य रक्तगटाचा प्लाझ्मा उपलब्ध होण्यावर सर्व काही अवलंबून आहे. दुर्मिळ रक्तगटाचा प्लाझ्मा उपलब्ध होण्यावर सर्व काही अवलंबून आहे.'' 

- डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा

Edited By : Siddharth Latkar