esakal | शरद पवार नेहमीच आधुनिक शिक्षणासाठी आग्रही : डाॅ. अनिल पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

शरद पवार नेहमीच आधुनिक शिक्षणासाठी आग्रही : डाॅ. अनिल पाटील

स्वातंत्र्योत्तर काळात कर्मवीरांच्या विचारांशी बांधिल राहून आधुनिक काळाशी सुसंगत बदल घडवत जगातील स्पर्धेच्या आव्हानाला तोंड देणारी पिढी तयारी करण्याचा दृष्टिकोन शरद पवार यांनी नेहमीच बाळगला. त्या दृष्टिकोनातून सर्वांचीच वाटचाल सुरू राहावी, असा आग्रह धरला. त्याचे दृश्‍य परिणाम दिसू लागले आहेत. साहजिकच संस्था, महाराष्ट्र आणि देशपातळीवरही या वेगळ्या शैक्षणिक दृष्टिकोनाची छाप पडून स्पर्धेत देश आघाडीवर राहील, असा विश्‍वास वाटतो असे रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांनी नमूद केले.

शरद पवार नेहमीच आधुनिक शिक्षणासाठी आग्रही : डाॅ. अनिल पाटील

sakal_logo
By
दिलीपकुमार चिंचकर

सातारा : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कायम ग्रामीण भागातील विद्यार्थी संशोधनाकडे वळले पाहिजेत असा आग्रह धरला. विज्ञानात अत्युच्च ज्ञान मिळविणारे विद्यार्थी तयार करण्याचे त्यांनी स्वप्न पाहिले. त्यादृष्टीनेच त्यांनी कायम मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रयत्नातून यशवंतराव चव्हाण इन्स्टिटयूट ऑफ सायन्स येथे दहा कोटीहून अधिक रुपये खर्च करुन संशोधन केंद्र उभारले आहे. आज त्यामुळेच ग्रामीण भागातील विद्यार्थी संशोधन करुन पेटंट मिळवित आहेत. शिक्षण विस्ताराबरोबरच दर्जेदार शिक्षण, व्यावसायिक शिक्षण विद्यार्थ्यांना द्या असा जो पवार साहेब नेहमी आग्रह धरत होते तो आम्ही अंमलात आणत आहोत, म्हणूनच आज रयत शिक्षण संस्था देशात आयडॉल होऊ शकली आहे. संस्थेचा कित्ता समस्त शिक्षण क्षेत्र गिरवत आहे असे रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांनी नमूद केले.

ते म्हणाले, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांना शिक्षण उपलब्ध करून देण्याचा विचार मांडला आणि कृतीमधून तो सिद्ध केला. कर्मवीर अण्णांचा हा विचार पुढे घेऊन जाण्यात अनेकांनी निश्‍चितच योगदान दिले. त्यात संस्थेचे विद्यमान अध्यक्ष व केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा वाटा खूप मोलाचा आहे. कर्मवीर अण्णांच्या विचारांवर कमालीची श्रद्धा असणाऱ्या श्री. पवार यांनी त्यांच्या मूळ विचारांचा ध्यास घेऊन सातत्याने पाठपुरावा करताना बदलत्या काळाची आव्हाने स्वीकारण्याची भूमिका वेळोवेळी दाखवून दिली. त्यामुळे संस्थेच्या ध्येयधोरणानुसार आधुनिक काळातील बदलांशी सुसंगत अशा शिक्षण पद्धतीतून सर्व घटकापर्यंत शिक्षण पोचविण्याचे अखंड प्रयत्न सुरू आहेत. श्री. पवार यांचा हा शिक्षणविषयक दृष्टिकोन केवळ संस्थेपुरता सीमित नाही, पूर्ण महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी सातत्याने खटाटोप करताना दिसत आहे आणि आता देशभर या दृष्टीचा विस्तार होण्याचाही आशावाद आहे.
 
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारसूत्रांनुसार श्री. पवार यांनी शैक्षणिक क्षेत्रात आपली भूमिका पक्‍की केली. रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील मुख्य कार्यालयात (कर्मवीर समाधी परिसरात) दरवर्षी नऊ मे रोजी होणाऱ्या कार्यक्रमातील श्री. पवार यांचे मार्गदर्शन म्हणजे कर्मवीरांचे शिक्षण विचार आणि बदलत्या काळाशी सुसंगत व्यवस्था याची सांगड घालण्याचा प्रयत्नच असतो, असे म्हटले तर ते चुकीचे ठरू नये. अगदी प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत आणि तांत्रिक-व्यावसायिक शिक्षणापासून संगणक आणि जैविकशास्त्राच्या महत्त्वापर्यंत कर्मवीरांच्या विचारांचा धागा जपत या जागतिक स्पर्धेची आव्हाने स्वीकारण्याचे विचार त्यांनी या व्यासपीठावरून दिले. केवळ विचार दिले नाहीत तर त्याप्रमाणे कृती करीत संस्थेच्या कामकाजाला दिशा दिली. महाराष्ट्राच्या शिक्षणक्षेत्रात हे बदल घडवून आणण्यासाठी प्रेरणा दिली. त्याची उपयुक्‍तता वेळोवेळी सिद्ध होत गेली. स्पर्धेच्या युगात नियोजनबद्ध पद्धतीने वाटचाल करीत शिक्षण क्षेत्राने आपली जबाबदारी पेलली तर उद्याची पिढी जगात आपले साम्राज्य निर्माण करू शकते, असा विश्‍वास पवार यांनी या क्षेत्राला दिला. साहजिकच या विचाराने प्रेरित होऊन संस्थेसह अनेक जण कार्यरत दिसतात. त्याचे दृश्‍य परिणाम जाणवू लागले आहेत. जाणवत राहतील.
 
श्री. शरद पवार यांनी प्रामुख्याने शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण व विस्ताराचा आग्रह सातत्याने धरला. प्राथमिक शिक्षणातील गळतीसंदर्भात त्यांनी वेळोवेळी चिंता व्यक्‍त केली. शिक्षणाची गुणवत्ता आणि दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचे आवाहन केले. व्यावसायिक शिक्षण, शिक्षणाचे जागतिकीकरण, संगणक-इंटरनेट आणि जैविक तंत्रज्ञान या बदलत्या काळाशी सुसंगत शिक्षणाचा अंगीकार करून ज्ञानसंपन्न होऊन सर्वसामान्यांचे जीवन समृद्ध करण्याची आस त्यांनी दाखवली. हे सर्व विचार मांडताना कर्मवीर अण्णांच्या विचारांशी बांधिल राहण्याची आठवण ते करीत होते. बदलत्या नव्या ज्ञानाच्या माध्यमातून धनसंपत्तीपेक्षा ज्ञान आणि कष्टाचे महत्त्व वाढीस लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे, असा विचार ते मांडू लागले. त्याचबरोबर आर्थिक स्वावलंबनाचा मुद्दाही तेवढ्याच तळमळीने ते समोर आणत होते. गॅट करारामुळे जग जवळ आले, स्पर्धा वाढली, या स्पर्धेत टिकायचे असेल तर गुणवत्ता हवी, दर्जा हवा असे विचार देताना श्री. पवार यांनी या स्पर्धेत आपण कोठे आहोत, नेमके काय करायला हवे याबाबतचा ऊहापोह सतत केला. या स्पर्धेत आघाडी घेण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. ते शिक्षण सर्वांना मिळाले पाहिजे. ग्रामीण भागातील, डोंगरी भागातील, उपेक्षित समाजातील आणि शिक्षणापासून वंचित असणाऱ्या मुलामुलींना या प्रवाहात आणण्यासाठी लक्ष देण्याची भूमिका त्यांनी मांडली. एका व्यापक विचाराची मांडणी करताना त्या विचारांची कृती करण्याचा आग्रह ते करीत त्या वेळी अर्थातच रयत संस्थेने ती जबाबदारी उचलण्याची त्यांची अपेक्षा असायची. त्याचबरोबर साऱ्या देशातील शिक्षण व्यवस्था या मार्गाने जाऊन स्पर्धेच्या युगात देशाचे स्थान भक्‍कम व्हावे, अशी इच्छाशक्‍ती ते व्यक्‍त करायचे.

शरद पवारांची संपत्ती आहे तरी किती ? सगळी माहिती आहे या रिपोर्टमध्ये

शिक्षणाचा विचार आणि गुणवत्ता या दोन्ही गोष्टींची गरज ते नेहमीच व्यक्‍त करीत. शेवटच्या माणसापर्यंत, शेवटच्या घटकाच्या मुला-मुलींपर्यंत शिक्षण पोचविण्यात आपण अयशस्वी झाल्याची खंतही ते व्यक्‍त करीत. शिक्षणप्रवाहापासून समाजातील मोठा वर्ग अद्यापही बाजूला असल्याचे निदर्शनास आणून देत आजही साक्षरतेचा प्रश्‍न आहे, स्त्री शिक्षणाची परवड आहे, शिक्षणाच्या अभावानेच अंधश्रद्धेचा प्रभाव आहे, असे मुद्दे ते प्रकर्षाने मांडतात. विस्तार वाढवला पाहिजे. दर्जाबाबत सतर्क राहिले पाहिजे, असा त्यांचा आग्रह राहिल्याने रयत शिक्षण संस्थेने या विचारांची अंमलबजावणी सुरू केली. संस्थेच्या परिवारात आज लाखो मुले-मुली शिक्षण घेत आहेत.
 
शिक्षणाचा विस्तार करताना गुणवत्तावाढीची खबरदारी घेण्याचा आग्रह त्यांनी धरला. ""बुद्धिमत्तेचा मक्ता ठराविक वर्गाचा नाही. उपेक्षित वर्गातील मुला-मुलींना संधी मिळाल्यास ते बुद्धीचा प्रकाश दाखवू शकतात. डोंगरी भागातील मुलेमुली या स्थित्यंतरापासून दूर राहणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे. मुलींच्या शिक्षणाकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. समानता, शिक्षण आणि निर्णय घेण्याची प्रक्रिया यात मुलींना संधी दिली पाहिजे. अशी संधी ज्या देशात दिली जाते ते देश समृद्ध झाले आहेत. त्यासाठी मुलींच्या शिक्षणाचा विस्तार करणे, त्यांना जबाबदारीच्या भूमिका बजावण्याची संधी प्राप्त करून देणे आणि त्यांना निर्णयप्रक्रियेत सहभागी करून घेणे हे काम केले तर राष्ट्र समृद्ध होईल,'' असे विचार त्यांनी दिले. शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्यासाठी कर्मवीर अण्णांनी घेतलेल्या भूमिकेची अंमलबजावणी करण्याची गरज ते व्यक्‍त करीत असतात.

प्राथमिक शिक्षणातील गळतीबाबत चिंता व्यक्‍त करताना प्राथमिक शिक्षणातही जिल्हा परिषद आणि नगरपालिका शाळांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा वर्ग, खासगी शाळांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा वर्ग आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांत शिकणारा वर्ग अशी वाटणी झाल्याचे ते निदर्शनास आणून देतात. प्राथमिक शिक्षणाकडे गावाचे लक्ष पाहिजे, गावाचा त्यात सहभाग पाहिजे. महिलांची समिती असली पाहिजे, मुले शिक्षणात रमली पाहिजेत, असे शिक्षण देण्याकडे कल असला पाहिजे असा आग्रह ते धरतात. प्राथमिक शिक्षण हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे. दलित, आदिवासी, भूमिहीन शेतमजूर, भटक्‍या विमुक्‍त जाती अशा अनेक उपेक्षित वर्गापर्यंत पोचण्याची जबाबदारी ते आग्रहपूर्वक मांडतात. गुणवत्तेच्या नावाखाली शिक्षणाचे मार्ग बंद करण्याची कल्पना ते मान्य करीत नाहीत. गुणवत्तेसाठी स्थानिक सहभाग 
वाढविणे. शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी, चांगले निकाल लागण्यासाठी कार्यकर्त्यांनी शाळेच्या गुणवत्तेकडे लक्ष दिले पाहिजे, शिक्षकांनी जाणीवपूर्वक गुणवत्ता सुधारण्याकडे लक्ष दिले पाहिजे, अशी भूमिका ते मांडतात.
 
शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी श्री. पवार यांच्या भूमिकेतून रयत शिक्षण संस्थेने वाटचाल करताना अनेक उपक्रम राबविले. कर्मवीर विद्या प्रबोधिनी हा उपक्रम त्याचाच एक भाग. प्रबोधिनीच्या परीक्षा गुणवत्तावाढीसाठी उपयुक्‍त ठरत आहेत. रयत टॅलेंट सर्च (आर. टी. एस.), गुरुकुल प्रकल्प (निवासी, अनिवासी, दूरस्थ), दहावीचे विशेष मार्गदर्शन, सेमी इंग्लिश वर्ग, सीईटी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र अशा विविध उपक्रमांतून शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. व्यक्तिमत्त्व विकास, इंग्रजी संभाषण, कला, क्रीडा अकादमीमार्फत अन्य उपक्रमही सुरू झाले. या उपक्रमांचा फायदा दिसू लागला आहे. दहावीचे निकाल सुधारले. बोर्डाच्या गुणवत्तायादीत संस्थेतील मुलामुलींचा समावेश वाढला. महाविद्यालयीन पातळीवर वेगळी कामगिरी होऊ लागली. व्यावसायिक शिक्षणाच्या दृष्टीने "रयत'ने आय. टी. आय.चे अभ्यासक्रम सुरू केले. देवापूर (ता. माण) सारख्या ठिकाणी व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू केले. ग्रामीण भागातील रोजगाराच्या संधी शोधून त्याप्रमाणे शिक्षण मिळून विद्यार्थ्याला त्याच्या पायावर उभे राहता येईल, असा प्रयत्न यशस्वी होऊ लागला आहे. एमसीव्हीसी सारखे अभ्यासक्रम राबविले जात आहेत. श्रमिक विद्यापीठांसारखी वेगळी संकल्पना साकारण्याचा प्रयत्न संस्था करीत आहे.

वाढदिनी शरद पवार व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून साधणार जनतेशी संवाद

शिक्षणाच्या जागतिकीकरणात स्पर्धेच्या युगात हा विद्यार्थी टिकला पाहिजे म्हणून संस्थेने एमबीए, इंजिनिअरिंग या क्षेत्रात वेगळे प्रयत्न सुरू ठेवले. मुंबई, पुणे यांसारख्या शहरांत जागा निश्‍चित करून ठेवली आहे. परदेशी विद्यापीठे भारतात आल्यास त्यांच्या सहकार्याने अशा शहरात उपयुक्‍त शिक्षणाची दारे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना खुले करून देण्याचे प्रयत्न यातून होणार आहेत. महाविद्यालयीन शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी "नॅक'च्या उपक्रमांवर लक्ष केंद्रित केले. स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन सक्षम केले. ग्रामीण भागातील विद्यार्थी संशोधनाकडे वळले पाहिजेत. विज्ञानात त्यांनी अत्युच्च ज्ञान मिळविले पाहिजे ही त्यांची धारणा कायम राहिल्याने त्यांच्या प्रयत्नातून यशवंतराव चव्हाण इन्स्टिटयूट ऑफ सायन्स येथे दहा कोटीहून अधिक रुपये खर्च करुन संशोधन केंद्र उभारले आहे. आज त्यामुळेच ग्रामीण भागातील विद्यार्थी संशोधन करुन पेटंट मिळवित आहेत.
 
शैक्षणिक विस्तार, गुणवत्ता आणि जगाच्या स्पर्धेत उतरतानाच सामाजिक परिवर्तनासाठी आवश्‍यक भूमिका स्वीकारण्याची जबाबदारी पेलण्याचे आवाहन श्री. शरद पवार सातत्याने करीत आले. उपेक्षित, आदिवासी समाजाचे, स्त्रीचे शिक्षण याबरोबरच अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रयत्न याबाबतही त्यांचा ठोस आग्रह राहिला. जागतिक स्पर्धेचे भान देत सतत अत्याधुनिक जगाशी संपर्कात राहून आवश्‍यक बदल करण्याची भूमिका त्यांनी घेतली. व्यवस्थापनशास्त्रातील बदल, संगणकक्षेत्राचे महत्त्व, जैवतंत्रज्ञानाची गरज या साऱ्या गोष्टींना ते महत्त्व देत राहिले. संस्थेने संगणकाच्या शिक्षणासाठी विशेष प्रयत्न सुरू ठेवले. तसेच जैवतंत्रज्ञानाच्या अभ्यासासाठी आवश्‍यक अभ्यासक्रमांची सुविधा उपलब्ध करून देत आहे. संगणक व इंटरनेट या दृष्टीने संस्थेच्या सर्व शाळांत शिक्षण सुविधा आज हजारो विद्यार्थी त्याचा लाभ घेत आहेत.

खूप बाेलण्याची इच्छा असलेल्या पवारांनी बाळासाहेबांची कमिटमेंट पाळली

समाजातील सर्व घटकांना शिक्षण मिळावे, यासाठी अट्टहास धरणाऱ्या श्री. पवार यांनी शिक्षणसंस्था ताकदीने आर्थिक स्वावलंबनाच्या तत्त्वावर उभ्या राहाव्यात, असे सुचविले. प्रशासनाची व्यवस्था या विचारांना पूरक काम करीत राहावी, असेही त्यांनी सांगितले आहे.  स्वातंत्र्योत्तर काळात कर्मवीरांच्या विचारांशी बांधिल राहून आधुनिक काळाशी सुसंगत बदल घडवत जगातील स्पर्धेच्या आव्हानाला तोंड देणारी पिढी तयारी करण्याचा दृष्टिकोन श्री. शरद पवार यांनी नेहमीच बाळगला. त्या दृष्टिकोनातून सर्वांचीच वाटचाल सुरू राहावी, असा आग्रह धरला. त्याचे दृश्‍य परिणाम दिसू लागले आहेत. साहजिकच संस्था, महाराष्ट्र आणि देशपातळीवरही या वेगळ्या शैक्षणिक दृष्टिकोनाची छाप पडून स्पर्धेत देश आघाडीवर राहील, असा विश्‍वास वाटतो.

संपादन  : सिद्धार्थ लाटकर