भाविकांची अलोट गर्दी असलेल्या वाठार स्टेशनातील रथोत्सवाला स्थगिती; देवस्थान समितीचा निर्णय

अतुल वाघ
Wednesday, 20 January 2021

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्र शासनाने यात्रा, उत्सवांवर निर्बंध घातले आहेत.

वाठार स्टेशन (जि. सातारा) : महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेला तसेच वाठार स्टेशन पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेला श्रीसमर्थ वाग्देव महाराज रथयात्रा उत्सव 29 जानेवारी रोजी होणार होता. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तो रद्द करण्यात आल्याची माहिती स्थानिक पोलिस प्रशासन, ग्रामस्थ व यात्रा समितीने दिली. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्र शासनाने यात्रा, उत्सवांवर निर्बंध घातले आहेत. यात्रेतील भाविकांच्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सर्व यात्रा उत्सव रद्द केल्या आहेत. दरवर्षी श्रीसमर्थ भगवान वाग्देव महाराज रथोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. रथोत्सव तसेच यात्रा उत्सवासाठी महाराष्ट्रभरातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात. वाग्देव महाराजांचा रथ समाधी स्थळापासून वाठार स्टेशन तसेच गावातून फिरवला जातो. रथाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी असते. आपला हात रथ ओढण्यासाठी लागावा यासाठी पंचक्रोशीतील भाविक येत असतात. यात्रेत भरपूर गर्दी होते. 

कुराण ग्रंथ शिकवणाऱ्या खुर्रमने जिंकली वाघेरीवासियांची मने; रस्त्यात सापडलेली रक्कम केली परत

गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून श्रीसमर्थ भगवान वाग्देव महाराजांची पुण्यतिथी व रथयात्रा उत्सव वाठार स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच ग्रामस्थ व देवस्थान समितीमधील पदाधिकाऱ्यांच्या समन्वयाने यंदाची रथ उत्सव यात्रा व सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात्रा उत्सव काळात मोजक्‍याच लोकांसह पारंपरिक धार्मिक विधी पार पाडण्यात येतील. भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी करू नये, असे आवाहन स्थानिक पोलिस प्रशासन व यात्रा समितीकडून करण्यात आले आहे. 

मी काळाच्या उदरात, विलीन झाल्यावर माझी सर्वजण आठवण काढतील

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News Samarth Bhagwan Vagdev Maharaj Festival At Wathar Station Canceled