डफळवाडीत गावगुंडांनी पळवलं शेतीतील पाणी; शिंदे कुटुंबीय छेडणार मंत्रालयासमोर आंदोलन

प्रवीण जाधव
Saturday, 20 February 2021

गेली 12 दिवस शिंदे कुटुंबीयांचे डफळवाडी येथे साखळी उपोषण सुरू आहे.

सातारा : न्यायालयाचे आदेश असूनही आमच्या शेतीतील झऱ्याचे पाणी गावगुंडांनी जबरदस्तीने दुसरीकडे वळवले. याबाबत तक्रारी करूनही प्रशासनाने दखल घेतली नाही. गेले 12 दिवस साखळी उपोषण सुरू असूनही न्याय दिला जात नाही. पिके वाळून चालल्याने असेही आमची उपासमार होणार आहे. गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांची त्याला साथ आहे. प्रशासनाला हेच हवे असल्यामुळे येत्या आठ दिवसांत मंत्रालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा डफळवाडी (ता. पाटण) येथील रामचंद्र शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला. 

गेली 12 दिवस शिंदे कुटुंबीयांचे डफळवाडी येथे साखळी उपोषण सुरू आहे; परंतु प्रशासनाकडून त्याची योग्य ती दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी आज आत्मदहनाचा इशारा दिला. या वेळी धुळाराम शिंदे, उमेश शिंदे, पूजा शिंदे, यशोदा शिंदे उपस्थित होते. श्री. शिंदे म्हणाले, "आमच्या पणजोबांनी 1928 रोजी डफळवाडी येथे मिरासपत्राने 24 हेक्‍टर जमीन कसायला घेतली होती. त्या जमिनीमध्ये असलेल्या तीन झऱ्यांच्या पाण्यावर तेव्हापासून आम्ही शेती करून उपजीविका चालवत आहे. 

कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार द्या, अन्यथा रास्ता रोको

कालांतराने कूळ कायद्याने ती जमीन आमच्या नावावर झाली. 2013 मध्ये पाणी योजनेच्या नावाखाली ग्रामपंचायतीने आमच्या झऱ्याचे पाणी बळकवायचा प्रयत्न सुरू केला. त्याबाबत आम्ही न्यायालयात गेलो होतो. पाटण न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिला. त्यानुसार आमच्या वहिवाटीत कोणालाही अडथळा करण्यास मनाई करण्यास ताकीद देण्यात आली आहे. त्याविरोधात ग्रामपंचायत कऱ्हाड जिल्हा न्यायालयात गेली. तेथे त्यांचे अपील फेटाळून लावण्यात आले.'' त्यानंतर काही त्रास नव्हता; परंतु ग्रामपंचायतीची सत्ता बदलल्यानंतर नोव्हेंबरमध्ये गावगुंडांनी एकत्र जमून आम्हाला मारहाण करत शेतीचे नुकसान केले, तसेच झऱ्याचे पाणी दुसऱ्याच्या शेतात वळले. याबाबत पोलिस ठाण्यात जाऊनही योग्य तक्रार घेतली नाही, असे त्यांनी सांगितले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News Shinde Family In Daphalwadi Warned To Agitation In Front Of The Ministry