esakal | छत्रपती शिवाजी महाराज, रामदास स्वामींच्या भेटीचे 'ते' शिल्प तत्काळ हटवा : श्रीमंत कोकाटे
sakal

बोलून बातमी शोधा

छत्रपती शिवाजी महाराज, रामदास स्वामींच्या भेटीचे 'ते' शिल्प तत्काळ हटवा : श्रीमंत कोकाटे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे श्रेय विशिष्ट सनातनी घेत आहेत. शहरातील शिल्प बसविण्याबाबत पालिकेची कोणतीही परवानगी घेतली नसताना अनधिकृतपणे शिल्पाची उभारणी केली आहे. या शिल्पामधून भाजपने जनतेच्या भावना भडकविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप विचारवंत डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी केला.

छत्रपती शिवाजी महाराज, रामदास स्वामींच्या भेटीचे 'ते' शिल्प तत्काळ हटवा : श्रीमंत कोकाटे

sakal_logo
By
प्रशांत घाडगे

सातारा : समाजातील काही सनातनी प्रवृत्तीच्या लोकांनी साताऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज व रामदास स्वामींच्या भेटीचे शिल्प उभारलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज व रामदास स्वामींच्या भेटीचा कुठलाही ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे छत्रपतींची बदनामी करणाऱ्या रामदास स्वामींचे शिल्प तत्काळ हटवून शिल्प बसविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी विचारवंत डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.
 
या वेळी पार्थ पोळके, अशोक गायकवाड, चंद्रकांत खंडाईत, अमर गायकवाड उपस्थित होते. या प्रकरणी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी, नगरपालिका, बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आली. डॉ. कोकाटे म्हणाले, ""छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे श्रेय विशिष्ट सनातनी घेत आहेत. शहरातील शिल्प बसविण्याबाबत पालिकेची कोणतीही परवानगी घेतली नसताना अनधिकृतपणे शिल्पाची उभारणी केली आहे. या शिल्पामधून भाजपने जनतेच्या भावना भडकविण्याचा प्रयत्न केला आहे.'' पोळके म्हणाले, ""छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने दाखवून भाजप इतिहासाचे विद्रुपीकरण करत आहे. या प्रकरणाबाबत पुरोगामी विचाराच्या सर्व संघटना एकत्रित येत लढा देणार आहेत.'' 

मराठा आरक्षणाबाबत अभ्यासाचा प्रश्न येतोच कुठे; उदयनराजेंचा भुजबळांवर जोरदार पलटवार
 
एक महिन्याचा "अल्टिमेटम' 
शहरात उभारण्यात आलेल्या शिल्पातील रामदास स्वामींचा पुतळा हटवून त्या ठिकाणी जिजाऊंचा पुतळा बसविण्याची मागणी पुरोगामी संघटनांनी केली आहे. संबंधित शिल्पातील रामदास स्वामींचा पुतळा एक महिन्यात हटवावा अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने पुतळा काढू, असा इशारा संघटनांनी दिला आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे