औंधमध्ये उद्यापासून जमावबंदी; यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकाऱ्यांचे महत्वपूर्ण आदेश

फिरोज तांबोळी
Wednesday, 27 January 2021

शुक्रवारी (ता. 29) रथोत्सवाच्या मुख्य दिवशी गावातील सर्व आर्थिक व्यवहार, दुकाने अत्यावश्‍यक सेवा वगळता बंद ठेवण्यात येणार आहेत.

औंध (जि. सातारा) : येथील श्री यमाईदेवीची यात्रा रद्द करण्यात आली असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने उद्यापासून शुक्रवारपर्यंत (ता. 29) औंधमध्ये जमावबंदी आदेश लागू करण्यात आला असून, तसा आदेश प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी जारी केला आहे. 

या आदेशात म्हटले आहे की, श्री यमाईदेवीच्या रथोत्सव व यात्रोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात भाविक औंध येथे येण्याची शक्‍यता आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव व प्रसार रोखण्यासाठी गुरुवार व शुक्रवार या दोन दिवसांसाठी औंध गावात पूर्णपणे जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. या आदेशान्वये पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. एकत्र येऊन मिठाई वाटप करणे, फटाके फोडणे, गुलाल उधळणे यासही बंदी घालण्यात आली आहे. 

वाटाघाटीने मार्ग निघत नसेल, तर लोहमार्गासाठी जमिनी सक्तीने ताब्यात घ्या; खासदारांचे सक्त आदेश

शुक्रवारी (ता. 29) रथोत्सवाच्या मुख्य दिवशी गावातील सर्व आर्थिक व्यवहार, दुकाने अत्यावश्‍यक सेवा वगळता बंद ठेवण्यात येणार आहेत. या आदेशाचा भंग करणारांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, प्रशासनाबरोबर समन्वय बैठकीत झालेल्या चर्चेनुसार केवळ पारंपरिक पद्धतीने पौषी उत्सवातील छबिना आणि रथोत्सव, धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. त्यामुळे भाविकांनी गर्दी करू नये. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी केले आहे. 

शेतकऱ्यांच्या हिंसक आंदोलनाला मोदी सरकारच जबाबदार; माजी मुख्यमंत्र्यांचा घणाघात

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News Yamaidevi Festival At Aundh Canceled