कोरोनाने फेरले त्यांच्या निरोपाच्या क्षणांवर पाणी...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जून 2020

पूर्वीच्या काळी जन्म तारखेला फारसे महत्व दिले जात नव्हते. त्यामुळे मुलाला शाळेत बसवायचे म्हणून जूनची तारीख लावली गेल्याची अनेकांची उदाहरणे आहेत. त्या काळात शिकलेले आता सेवानिवृत्तीच्या वाटेवर आहेत. त्यामुळे जून महिना हा सेवा निवृत्तांच्या सत्कार सोहळ्यांची एक पर्वणीच असतो. परंतु, आता सगळे चित्रच बदलले आहे.

नागठाणे : सेवापूर्तीचा सोहळा म्हणजे एका डोळ्यात हासू अन्‌ दुसऱ्या डोळ्यात आसू. एका बाजूला नोकरी पूर्णत्वास गेल्याचे समाधान, तर दुसऱ्या बाजूला इथून पुढे रिकामी राहणारी पोकळी. लॉकडाउनमुळे यंदा सारेच सेवापूर्तीचे सोहळे रद्द झाले. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या निरोपाच्या क्षणांवर पाणी फिरल्याचे चित्र पहावयास मिळाले. 

पूर्वीच्या काळी अचूक जन्मतारखा ठाऊक नसल्यामुळे एक जून हाच जन्मदिन बहुतेकांच्या वाट्याला आला. त्यात तत्कालीन गुरुजनांची कृपा हीदेखील महत्त्वपूर्ण ठरली. वयाची 58 वर्षे पूर्ण केल्यानंतर शासकीय नियमानुसार सरकारी कर्मचारी सेवानिवृत्त होतो. अशांपैकी बहुतेकांच्या सेवानिवृत्तीची तारीख ही 31 मे असते. या अनुषंगाने काल जिल्ह्यातील कित्येक सरकारी कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीची तारीख होती. अलीकडच्या काळात अशा सेवापूर्ती कार्यक्रमांना उत्सवाचे रुप आल्याचे आढळते. अर्थात ते स्वाभाविकही ठरते. 

जवळपास तीसहून अधिक वर्षाच्या सेवेच्या पूर्तीचा दिवस. त्यात साफल्याची भावनाही दडलेली असते. आजवरची सारी सेवा यशस्वी केल्याचे समाधान दिसते. त्यामुळेच हा सेवापूर्तीचा कार्यक्रम संस्मरणीय करण्याचा प्रत्येक कर्मचाऱ्या, त्याच्या कुटुंबियांचा प्रयत्न असतो. असे कार्यक्रम साजरे करताना शासकीय अधिकारी, आजवरचे सहकारी, स्नेही, आप्तजन यांना आमंत्रित केले जाते. आजवरच्या सेवेच्या कारकीर्दीचा ताळेबंद मांडला जातो. भावनांना मोकळी वाट करुन दिली जाते. उपस्थितांकडूनही आदर- सत्कार केला जातो. यंदा मात्र लॉकडाउनमुळे सारेच चित्र बदलल्याचे चित्र प्रत्ययास आले. लोकांनी एकत्र येणे, समारंभ साजरे करणे याला मज्जाव असल्यामुळे कोणताच सेवापूर्ती कार्यक्रम आयोजित करता आला नाही. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या निरोपाच्या क्षणावर पाणी फिरल्याची भावना व्यक्त होत आहे. 

दरम्यान, कार्यक्रम करता येत नसला तरी आपला हा दिवस कायमस्वरूपी लक्षात रहावा यासाठी वासोळे (ता. सातारा) येथील प्राथमिक शाळेच्या शिक्षिका छाया अशोक शिंगटे यांनी या दिवसाचे ओैचित्य साधून रक्तदान केले. सोै. शिंगटे या शिक्षक बॅंकेच्या माजी संचालिका आहेत. शैक्षणिक विकासात त्यांनी भरीव योगदान दिले आहे. एक उपक्रमशील शिक्षिका असा त्यांचा लोैकिक आहे. 

गंभीर..! सातारा जिल्ह्यातील कोरोना वाॅर्ड फुल्ल 

...तरीही सातारी कंदी पेढ्याची चवच न्यारी 

सातारा मिलिटरी कॅन्टीनबाबत महत्वाची बातमी 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara No Retirment eremony Due to Covid 19