esakal | पावसामुळे कोबीवर घाण्या, करप्या रोगाचा प्रादुर्भाव
sakal

बोलून बातमी शोधा

Satara

करपा रोगामुळे शेतकऱ्यांचे वर्षानुवर्षे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. हवामानात थोडाफार बदल झाला तरी पिकावर करपा येत असल्यामुळे शेतकरीवर्ग पुरता हताश झाला आहे. 

पावसामुळे कोबीवर घाण्या, करप्या रोगाचा प्रादुर्भाव

sakal_logo
By
केशव कचरे

बुध (जि. सातारा) : उत्तर खटाव परिसरातील बुध, करंजओढा, काटेवाडी परिसरात कोबी पिकावर करपा, घाण्या आणि हिरव्या अळीचा प्रादुर्भाव झाला असून, हातचे पीक जाण्याच्या शक्‍यतेमुळे शेतकरी चिंतातूर झाले आहेत. सततचा पाऊस, पहाटे पडणारे दव, धुके या प्रतिकूल हवामानाचा बागायती पिकांवर परिणाम झाला आहे. 

खटाव तालुक्‍याचा उत्तर भाग बागायती पट्टा म्हणून ओळखला जातो. कांदा, बटाटा, आले आदी नगदी पिकांबरोबर कोबी, फ्लॉवर, मिरची, टोमॅटो, काकडी अशी कमी कालावधीत चांगले उत्पन्न देणारी भाजीपाल्याची पिके या परिसरात मोठ्या प्रमाणात घेतली जातात. यावर्षी कोरोनामुळे मुंबई, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आदी बाजारपेठा बंद राहिल्या. परिणामी मागणीअभावी दरात घसरण झाल्याने पहिल्या हंगामातील पिके शेतातच सडून गेली. या पिकात शेतकऱ्यांचा भांडवली खर्चही निघाला नाही. यातून सावरत असतानाच सध्या दुसऱ्या टप्प्यातील पिके प्रतिकूल हवामानाला बळी पडताना दिसत आहेत. यात प्रामुख्याने मिरची, कोबी, फ्लॉवर व कांदा रोपावर करपा व किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे.

पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत सुरू असून, महागड्या बुरशीनाशक औषधाच्या वारंवार फवारण्या करूनही करपा आटोक्‍यात येत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी पीक सोडून दिले आहे. तर काहींनी उभ्या पिकात रोटर मारून नांगर फिरवला आहे. अलीकडे शेतकऱ्यांची बियाणात फसवणूक होत असल्याचे व अशा सदोष बियाण्यामुळे उत्पन्नात घट येत येऊन पिकावर करप्यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. करपा रोगामुळे शेतकऱ्यांचे वर्षानुवर्षे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. हवामानात थोडाफार बदल झाला तरी पिकावर करपा येत असल्यामुळे शेतकरीवर्ग पुरता हताश झाला आहे. 

प्रभावी बुरशीनाशक उपलब्ध नाही 

दुर्दैवाने या रोगावर एकही प्रभावी बुरशीनाशक आज बाजारात उपलब्ध नाही. शेतकऱ्यांच्या या समस्येकडे कृषी विभागाने गांभीर्याने पाहण्याची गरज असून, शेतकऱ्यांनी पिकावर केलेला लाखो रुपयांचा खर्च करपा रोगामुळे मातीत गाडला जात आहे. 

संपादन : पांडुरंग बर्गे  

loading image
go to top