व्वा..! सवंगड्यांनी थाटला घरगुती राखी उद्योग

यशवंतदत्त बेंद्रे
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

पाटण तालुक्‍यातील आंबळे येथील शाळकरी मुलांनी एकत्र येत घरगुती राखी उद्योग सुरु केला आहे. त्याला प्रतिसादही चांगला मिळत आहे. रोज चार-पाच तास काम करून सुमारे 25 हजार रुपयांची ऑर्डर झाली असून या निमित्ताने मोकळ्या वेळेचा फायदा होऊन चार पैसे गाठीलाही पडल्याने हे सवंगडी समाधानी आहेत. 

तारळे (जि. सातारा) : एखादी गोष्ट मनापासून ठरवली तर निश्‍चितच मार्ग भेटतो, असाच काहीसा किस्सा आंबळे (ता. पाटण) येथील शाळकरी मुलांच्या बाबतीत घडला. लॉकडाउनच्या मोकळ्या वेळेचा सदुपयोग करीत घरगुती राखी उद्योग थाटला, त्यास प्रतिसादही मिळाला. त्यातून कुटुंबासाठी चार पैसे गाठीलाही पडले. शिवाय नावीन्यपूर्ण काम केल्याचा आनंददेखील मिळाल्याची भावना सर्व सवंगडी व्यक्त करीत आहेत. 

आंबळे येथील शिंदे, खरात व पाटणकर कुटुंबातील सदस्यांचा घरोबा आहे. नीलम शिंदे हिला आपण राख्या तयार करूया, अशी कल्पना सुचली. त्यास बाकीच्या सवंगड्यांनी साथ केली. त्यास कुटुंबातील ज्येष्ठांनी पाठिंबा दर्शविला. मग, कच्चा माल खरेदी करून हाताच्या साह्याने राख्या बनविण्यास सुरुवात केली. विविध प्रकारच्या आकर्षक राख्या बनविल्या. लोकरीपासून, हाताने विणून या राख्या बनविल्या, शिवाय लोकांना परवडणाऱ्या दरात त्याची किंमत ठेवली असल्याचे नीलम शिंदे हिने दै. "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

कुटुंबीयांच्या ओळखीने तारळे विभागातील तारळेसह आवर्डे, धुमकवाडी, वजरोशी, कोंजवडे, उंब्रज, सातारा, कऱ्हाड, ढोरोशी, हरपळवाडी, भुडकेवाडी, पाल आदी गावांत सुमारे 200 डझन राख्या दिल्या आहेत. 250 डझनची ऑर्डर देणे बाकी आहे. 100 डझन ऑर्डर "फेसबुक सातारा'च्या माध्यमातूनदेखील मिळाली आहे. या व्यवसायात पूनम शिंदे, वैष्णवी खरात, नीलम शिंदे, पूजा पाटणकर, सुमित पाटणकर, आकाश शिंदे, विराज खरात आदी सहभागी झाले. रोज चार-पाच तास काम करून सुमारे 25 हजार रुपयांची ऑर्डर झाली असून या निमित्ताने मोकळ्या वेळेचा फायदा होऊन चार पैसे गाठीलाही पडले आहेत. त्यांच्या या नावीन्यपूर्ण व्यवसायाचे कौतुक होत आहे. 

(संपादन ः संजय साळुंखे) 

 

एरवी थंड असलेले महाबळेश्वर अचानक तापले, नेमकं काय झाले रात्री वाचा सविस्तर 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara ow ..! Domestic rakhi industry started by his peers