
Satara : अन् ऊसतोड महिलेच्या घराचे स्वप्न साकारले
कऱ्हाड : स्वत:चे घर असावे, असे स्वप्न अनेकांकडून पाहिले जाते. वेळप्रसंगी पोटाला चिमटा काढून, दिवसरात्र काबाडकष्ट करून ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड केली जाते. मात्र, गेल्या दशकभरात घरांच्या व जागांच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे सामान्य माणसाच्या घराच्या स्वप्नाला अडथळ्यांचा सामना करावा लागत होता.
अशीच स्थिती मूळच्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे या गावच्या असणाऱ्या आणि गेल्या काही वर्षांपासून नडशीत वास्तव्यास असलेल्या शारदा अरुण क्षीरसागर यांची झाली होती. त्याचा विचार करून त्यांनी घरकुलासाठी अर्ज केला.
त्यांना घरकुलही मंजूर झाले. त्यांनी मोठ्या जिद्दीने स्वतः राबून मजुरांमार्फत पंचायत समीतीच्या सहकार्याने घरकुलाचे काम पूर्ण करून घराचे स्वप्न साकार केले. एका ऊसतोड मजूर महिलेला छप्पर मिळाल्याने तिचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
१९७२ मध्ये मोठा दुष्काळ पडला. त्यामुळे बार्शीसारख्या (जि. सोलापूर) तालुक्यात, तर मोठी बिकट अवस्था झाली होती. अशा परिस्थितीत उपळाई ठोंगे गावातील अरुण क्षीरसागर, त्यांच्या पत्नी शारदा मुलांसह नडशी (ता. कऱ्हाड) गाव गाठले. त्या वेळी त्यांनी यशवंतनगर येथील सह्याद्री साखर कारखान्यात ऊसतोडणी करण्यासाठीचे काम सुरू केले.
त्या वेळी ते कुडामेडाच्या चंद्रमोळी झोपडीत राहात होते. त्यांना त्याचा पावसाळ्यात मोठा फटका बसला. दर वर्षी पावसाळ्यात होणाऱ्या या गैरसोयीचा विचार करून शारदा यांनी स्वतःचे घर नडशीतच बांधण्याचा संकल्प केला होता. मात्र, पैशांची अडचण होती. त्यांनी पोटाला चिमटा काढून, प्रसंगी कधी-कधी उपाशी राहूनही संसाराचा गाढा हाकला.
त्या वेळी त्यांनी दिवसरात्र ऊसतोडीचे काम करून घामाच्या मिळणाऱ्या दामातून पैन् पै साठवले. दरम्यानच्या काळात त्यांनी मुलांना साखर शाळेत घालण्यास सुरुवात केली. घर बांधण्यासाठी त्यांना घरकुलाचा लाभ घ्यावा, असे काहींनी सुचवले. मात्र, त्यांना जागेची अडचण होती. त्यांचे मूळ गाव नडशी नसल्याने स्वतःची जागा नव्हती. साठवलेल्या पैशांतून घरासाठी त्यांनी नडशीतच जागा खरेदी केली. त्यामुळे साठवलेले पैसेही संपले.
उतारा घरपोच...
ऊसतोड मजूर महिलेने आयुष्यभर कष्ट करून जिद्दीने संसार उभा करून घर बांधणे, ही सोपी गोष्ट नाही. त्याची दखल घेत गटविकास अधिकारी साळुंखे यांनी सहायक गटविकास अधिकारी विजय विभूते यांच्या समवेत घरकुलाला भेट दिली. त्यांनी संबंधित महिलेच्या जिद्दीला सलाम करून त्यांचा सत्कार केला. या वेळी त्यांना घराचा उताराही त्यांच्या हाती दिला.
दानशूरांनो, एक पाऊल पुढे या....
ज्यांना घर बांधायचे आहे. मात्र, आर्थिक कुवत नाही अशांसाठी घरकुल योजनांचा लाभ शासन देते. मात्र, ज्यांनी आयुष्यभर कष्ट केले, स्वतःची जागाही घेतली आहे, मात्र त्या जागेवर घर बांधताच येत नाही, अशांसाठी समाजातील दानशूरांना ही एक सादच आहे. आपण आपल्या घराचे स्वप्न पूर्ण केले आहे. मात्र, आर्थिकदृष्ट्या बेताची परिस्थिती असणाऱ्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी दानशूरांना एक पाऊल पुढे येण्याची गरज आहे.
आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्यांना घरकुलाचा लाभ घेता यावा, यासाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, रमाई घरकुल योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, शबरी आवास योजना आहेत. त्याचा लाभ घ्यावा. ज्यांची घरकुले मंजूर आहेत, त्या लाभार्थ्यांनी घरकुलांचे काम सुरू करून १५ फेब्रुवारीपर्यंत घरकुल पूर्ण करावे.
- मीना साळुंखे, गटविकास अधिकारी,पंचायत समिती, कऱ्हाड