बिबट्यांच्या जोडीची दहशत; तळबीडसह वहागावचे शेतकरी हतबल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satara

तळबीड येथे गेल्या चार ते पाच वर्षांपासून बिबट्या व त्याच्या बछड्यांचे वास्तव्य आहे. बिबट्याने अनेकदा पाळीव जनावरे, वासरू, रेडकू, कुत्रे, शेळ्यांवर हल्ले केले आहेत. सद्यःस्थितीत दोन बिबट्यांचे एकाच वेळी दर्शन वारंवार दर्शन होत असल्यामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण आहे. 

बिबट्यांच्या जोडीची दहशत; तळबीडसह वहागावचे शेतकरी हतबल

वहागाव (जि. सातारा) : तळबीडसह वहागाव परिसरात बिबट्यांची दहशत कायम असून, शुक्रवारी सायंकाळी तळबीड येथील शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत दोन बिबट्यांनी तेथील वासरावर हल्ला करून त्याचा फडशा पाडला. या घटनेने तळबीडसह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून येथे बिबट्यांचे वास्तव्य आहे; परंतु अद्याप वनविभागाला बिबट्यांचा बंदोबस्त करणे शक्‍य झाले नसल्याने ग्रामस्थांत वनविभागाविषयी संतापाचे वातावरण आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी, की तळबीड (ता. कऱ्हाड) येथील हंबीररावचा दरा नावच्या शिवारात येथील उमेश मोहिते यांच्या मालकीचे शेत आहे. या शेतात सतीश गायकवाड यांच्या गाईचे दीड वर्षाचे वासरू बांधण्यात आले होते. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अचानक दोन बिबट्यांनी वासरावर हल्ला केला व वासरू ठार केले. सतीश गायकवाड यांच्यासमोर ही घटना घडली; परंतु दोन बिबट्यांना एकत्रित पाहून त्यांनाही विरोध करता आला नाही. दरम्यान, सायंकाळी वन कर्मचारी शंभू माने यांनी मृत वासराचा पंचनामा करून ते शिवारात पुरण्यात आले. 

दरम्यान, तळबीड येथील वसंतगड परिसरात बिबट्या व त्याच्या कुटुंबाचे वास्तव्य आहे. मागील महिन्यात शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या युवकांना सायंकाळी घरी परतताना एकापाठोपाठ चाललेल्या दोन बिबट्यांचे दर्शन झाले होते. या युवकांनी मोबाईलवरून या बिबट्यांचे केलेले चित्रीकरणही व्हायरल झाले आहे. वास्तविक तळबीड येथे गेल्या चार ते पाच वर्षांपासून बिबट्या व त्याच्या बछड्यांचे वास्तव्य आहे. बिबट्याने अनेकदा पाळीव जनावरे, वासरू, रेडकू, कुत्रे, शेळ्यांवर हल्ले केले आहेत.

सद्यःस्थितीत दोन बिबट्यांचे एकाच वेळी दर्शन वारंवार दर्शन होत असल्यामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने तातडीने पिंजरा लावून या बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सातत्याने होत आहे. मात्र, वनविभाग विविध कारणे सांगून पिंजरा लावण्यासाठी चालढकल करीत असल्याचे तेथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. बिबट्याकडून सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांमुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान होत असल्यामुळे परिसरातील शेतकरी वर्ग पूरता हतबल झाला आहे. कोणतीही अनुचित घटना घडण्यापूर्वी वनविभागाने बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने तळबीडसह परिसरातील शिवारात पिंजरा लावावा, अशी मागणी होत आहे. 

संपादन : पांडुरंग बर्गे 

Web Title: Satara Panic Pair Leopards Farmers Talbid And Wahagaon Palm Seeds

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Satara
go to top