अर्ज कोल्हापूर, सांगलीचा अन् मुक्काम साताऱ्यात; कसा येणार कोरोना आटोक्यात

सचिन शिंदे
शुक्रवार, 29 मे 2020

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासन व प्रशासनच्या पातळीवर विविध उपाय योजना राबविल्या जात आहेत. नागरिकांनीही प्रामाणीकपणे शासनाने दिलेल्या सुचना पाळण्याचे आवाहन केले जात आहे. कोरोना संसर्ग टाळला जावा हाच या मागचा हेतू आहे. परंतु, काही महाभागांना आपल्या कुटुंबाबरोर आपल्या समाजाचीही काळजी वाटत नाही. आपल्यामुळे आजार पसरू नये याची काळजी सोडाच पण धोका कसा वाढेल अशी कृत्ये केली जात आहेत. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांना कोरोना संसर्गाचा धोका वाढू शकतो.

कऱ्हाड ः मुंबई, पुण्याहून सातारा जिल्ह्यात येणारे नागरिक ई-पास काढताना त्यांच्या प्रवासाच्या तपशिलाची खोटी माहिती देत आहेत. होम क्वारंटाइनचा शिक्का टाळण्यासाठी अर्ज भरताना कोल्हापूर व सांगलीला जात असल्याचे दाखवून प्रत्यक्षात जिल्ह्यातच येत आहेत. त्यामुळे त्यांचा जिल्ह्यामध्ये मुक्त संचार सुरू आहे. मुंबईकर बाधित होण्याचे प्रमाण पाहता अशा फसवणूक करणारांमुळे जिल्ह्याचा धोका वाढत आहे. हे प्रकार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. 

परजिल्ह्यांतून जिल्ह्यात येणाऱ्यांसाठी नऊ तपासणी नाकी पोलिसांनी तयार केलेली आहेत. या ठिकाणी आरोग्य विभागाचीही यंत्रणा आहे. बाहेरून जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येकाची त्या ठिकाणी तपासणी होते. तपासणीमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली नाही तर, संबंधित व्यक्तीच्या हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का मारला जातो. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला 14 दिवस घरातच राहावे लागत होते. ते सर्वांच्या भल्यासाठीच होते.

मात्र, काहींना इतरांना होणाऱ्या धोक्‍यापेक्षा स्वत:ला घराबाहेर पडता यावे, मुक्तसंचार करता यावा, हे महत्त्वाचे आहे. अर्ज भरताना असे लोक आपल्या मुक्कामाच्या ठिकाणचा पत्ता कोल्हापूर किंवा सांगली जिल्ह्यातील टाकत आहेत. त्यानुसार त्यांना कोल्हापूर किंवा सांगलीला जाण्याचा पास मिळतो. जिल्हा ओलांडून पुढे जाणार असल्यामुळे जिल्ह्याच्या सीमेवर त्यांना होम क्वारंटाइनचा शिक्का मारला जात नाही. वास्तविक या लोकांना जिल्ह्यातच थांबायचे असते. परंतु, या शुद्ध फसवणुकीमुळे त्यांच्या हातावर शिक्का उमटत नाही. त्याचा गैरफायदा घेत ते त्यांचा जिल्ह्यात मुक्तसंचार करत आहेत.

संबंधित व्यक्ती या कोल्हापूर किंवा सांगलीच्या पत्त्यावर पोचली का, याची उलट तपासणी होत नसल्याचा फायदा संबंधितांकडून घेतला जातो आहे. सर्व ग्रामस्तरीय समित्या हे प्रकार रोखण्यात पुरेशा ठरत नाहीत. त्यामुळे अशांकडून होणारा कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ठोस उपाययोजना होणे आवश्‍यक आहे. 

 

""मुंबई बाजूकडून जिल्ह्यात येणाऱ्यांची तपासणी शिरवळच्या चेकनाक्‍यावर होत आहे. प्रत्येकाला होम क्वारंटाइनचा शिक्का मारून पाठवले जात आहे. मात्र, कोल्हापूर, सांगली जिल्ह्याचा प्रवास करणाऱ्यांना शिक्का मारला जात नाही. असे जिल्ह्यातच थांबले तर, त्यांना क्वारंटाइन करण्याची जबाबदारी ग्रामस्तरीय समित्यांवर आहे. असे काही लोक असतील तर, त्याबाबत या समित्यांनी फसवणुकीची तक्रार द्यावी.'' 

-तेजस्वी सातपुते, 
पोलिस अधीक्षक, सातारा 

बापरे..! सातारा जिल्ह्यात कोरोनाचा मृत्युदर वाढला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Passengers Mentioning Wrong Information While Creating E-Pass