
गोंदवले (जि. सातारा) : टाळ-मृदंगाची थाप...हरिनामाचा गजर... डोक्यावरची तुळस...अन् विसाव्यातील कीर्तन ही आषाढी वारीतील दृश्ये यंदा आठवणीच्या कोपऱ्यातच राहिली आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रिमझिम पावसातील भक्तीच्या ओढीने निघालेली पंढरीची वाट यंदा भाविकांनी फुललीच नाही. पायी वारी नसल्याने दरवर्षी भक्तीच्या महामार्गातील गावांमध्ये वारकऱ्यांअभावी शुकशुकाटच दिसत आहे.
पंढरीच्या आषाढी वारीची महिनाभरापूर्वीच चाहूल लागते अन् वारकऱ्यांची पायी वारीसाठीची तयारी सुरू होते. सावळ्या विठूरायाला भेटण्याची आस घेऊन ज्ञानोबा माऊली व तुकोबा महाराजांसह गावोगावच्या पायी दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. परिणामी दिंड्यांच्या मार्गावरील गावांतही मोठ्या उत्साहाने भारलेले वातावरण पाहायला मिळते. गावात विसावणाऱ्या पायी दिंड्यांतील वारकऱ्यांची ग्रामस्थांकडून मोठ्या भक्तिभावाने सेवा करून विठ्ठल सेवा केल्याचे समाधान मिळविण्याची धडपड या काळात पाहायला मिळते. गावात एकामागून एक येणाऱ्या विविध संतांच्या पायी दिंड्यांच्या आगमनामुळे व्यापारातही चांगली उलाढाल होत असते. एकूणच आषाढी वारी ही केवळ भक्तीसाठीच नव्हे तर अध्यात्मिक, सामाजिक, आर्थिक अशा अनेक बाबींना चालनादायी ठरत असते.
यंदा मात्र या साऱ्यांवरच कोरोनाचे गडद सावट आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून शासनाने पायी वारीसाठी बंधने घातली आहेत. त्यामुळे दरवर्षी वारकऱ्यांनी गजबजलेल्या भक्तीच्या अनेक मार्गांसह सातारा-पंढरपूर रस्त्यावरदेखील यंदा पूर्ण शांतता दिसत आहे. या मार्गावरील पुसेगावचे सेवागिरी महाराज, गोंदवल्याचे ब्रह्मचैतन्य महाराज समाधी मंदिरे तर म्हसवडचा सिद्धनाथ ही तीर्थक्षेत्रे देखील अद्याप बंदच आहेत. ज्ञानेश्वर महाराज पालखीदेखील माण तालुक्याच्या सीमेजवळून जात असल्याने शिखर शिंगणापूरसह गोंदवले व म्हसवड येथेही दर्शनासाठी वारकरी गर्दी करतात. यंदा पायी वारी नसल्याने ही गर्दी देखील पाहायला मिळाली नाही. परिणामी व्यवसायांवरदेखील चांगलाच परिणाम झाला.
...मनी विठू चरणी लीन
वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी न मिळाल्याने यंदा ग्रामस्थांमधून देखील नाराजी व्यक्त होत आहे. नित्याच्या वारकऱ्यांच्या वारीत यंदा खंड पडला असल्याने वाईट वाटत असले तरी "जरी नाही चालली पंढरीची वाट, मनी विठू चरणी लीन' अशीच भावना सध्या भविकांमधून व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.