
सातारा : सैदापूर (ता. सातारा) येथील जवानाचा खून दारू पिऊन त्रास देत असल्याच्या कारणावरून पत्नी, भावजय व मेहुण्यानेच केल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पत्नी चेतना संदीप पवार (वय 35, रा. सैदापूर, ता. सातारा), भावजय सुषमा राहुल पवार (वय 38, रा. यादोगोपाळ पेठ, सातारा) व मेहुणा सोमनाथ भरत अंबवले (रा. खोलवडी, ता. वाई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
संदीप पवार हे सैन्य दलात नोकरी करत होते. काही दिवसांपूर्वी ते सुटीवर घरी आले होते. रविवारी (ता. 27) सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांना अनोळखी व्यक्तीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याचे सांगत पत्नी व नातेवाईकांनी पुणे येथील कमांड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. त्या ठिकाणी काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात त्यांना गंभीर जखमा असल्याचे समोर आले. त्यानुसार पत्नी चेतना यांची फिर्याद घेऊन वानवडी पोलिसांनी अनोळखी व्यक्तीवर खुनाचा गुन्हा दाखल केला. काल हा गुन्हा तपासासाठी तालुका पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला होता. सैनिकाचा खून झाल्याची घटना गांभीर्याने घेत पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे (एलसीबी) निरीक्षक किशोर धुमाळ यांना गुन्ह्याचा तपास तातडीने करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार त्यांनी सहायक निरीक्षक रमेश गर्जे यांच्या नेतृत्वाखाली एक तपास पथक तयार केले. या पथकाने संदीप यांच्या घरी जाऊन नातेवाइकांकडे चौकशी केली. त्या वेळी त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे आली. त्यामुळे पोलिसांनी गोपनियरीत्या परिसरातील लोकांकडून माहिती काढली. त्यानंतर नातेवाइकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांच्या चौकशीमध्ये पत्नी, भावजय व मेहुण्यानेच संदीप यांचा खून केल्याचे समोर आले. संदीप हे सुटीवर घरी आल्यापासून दारू पिऊन घरातील लोकांना शिवीगाळ व मारहाण करून त्रास देत होते. त्यामुळे आम्ही घरातील लाकडी दांडक्याने त्यांना मारहाण केली, तसेच पोलिसांचा आमच्यावर संशय येऊ नये, म्हणून त्यांना साताऱ्यातील रुग्णालयाऐवजी पुण्यातील कमांडो रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याचे व त्यांना अनोळखी व्यक्तींनी मारहाण केल्याची फिर्याद दिल्याचे संशयितांनी पोलिसांना सांगितले आहे. पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ, सहायक निरीक्षक रमेश गर्जे, सहायक फौजदार ज्योतिराम बर्गे, हवालदार आतिष घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, संतोष पवार, शरद बेबले, साबीर मुल्ला, प्रवीण फडतरे, मुनीर मुल्ला, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, अजित कर्णे, अर्जुन शिरतोडे, नीलेश काटकर, गणेश कापरे, रोहित निकम, सचिन सासणे, वैभव सावंत व संजय जाधव यांनी या कारवाईत सहभाग घेतला. गुन्ह्याची माहिती मिळाल्यानंतर अवघ्या चार तासांत हा गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल अजय कुमार बन्सल, अतिरिक्त अधीक्षक धीरज पाटील यांनी एलसीबीच्या संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले.
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.