
सातारा : दुचाकीच्या सायलेन्सरमध्ये फेरबदल करून त्यामधून छातीत धडकी भरेल असा फटाक्यांचा आवाज काढत दुचाकी दामटणाऱ्यांवर वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या दोन दिवसांत वाहतूक शाखेने विशेष मोहीम राबवली. पोलिसांनी सायलेन्सरमध्ये फेरबदल केलेली वाहने दुचाकीस्वारांसमवेत त्यांच्याच वाहनांवर बसून कार्यालयात आणली. ४० मॉडिफाइड केलेले सायलेन्सर जागेवरच काढून दुचाकीस्वारांना पुन्हा वाहन ताब्यात देण्यात आले.