Gram Panchayat Election : पुस्तकांच्या गावात राष्ट्रवादीसमोर भाजप-सेनेचे तगडे आव्हान

रविकांत बेलोशे
Tuesday, 12 January 2021

अनुभवी आणि निष्णात राजकारणी अशी ओळख असलेल्या बाळासाहेबांसमोर भाजपचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष तानाजी भिलारे यांनी आपली ताकद आजमावण्यासाठी शड्डू ठोकला आहे.

भिलार (जि. सातारा) : पुस्तकांचे गाव अशी ओळख असलेल्या येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा धुरळा उडू लागला असून, ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे यांच्या गटाला शह देण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या गटांनी कंबर कसली आहे. 

माजी आमदार (कै.) भि. दा. भिलारे तथा भिलारे गुरुजी व ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे यांचे गाव भिलार. बाळासाहेब भिलारे यांच्या विचारांचा पगडा या गावावर आहे. असे असले तरी अलीकडच्या काळात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विचाराला भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आव्हान उभे केले आहे. अनुभवी आणि निष्णात राजकारणी अशी ओळख असलेल्या बाळासाहेबांसमोर भाजपचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष तानाजी भिलारे यांनी आपली ताकद आजमावण्यासाठी शड्डू ठोकला आहे. ग्रामपंचायतीत तीन वॉर्ड असून, यातून नऊ जागा निवडून द्यावयाच्या आहेत. जननीमाता वॉर्डमधून वैशाली कांबळे, शीतल पवार, वॉर्ड तीनमधून संदीप पवार या आरक्षित ठिकाणावरून उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, तर काही ठिकाणी दुरंगी, तर काही तिरंगी लढती होत आहेत. जननीमाता वॉर्डमधील खुल्या जागेवर शिवाजी शंकर भिलारे विरुद्ध रोहन राजेंद्र भिलारे, तर शिवाजी वॉर्ड क्रमांक दोनमधील खुल्या जागेवर माजी सरपंच व जावळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र भिलारे विरुद्ध वैभव भिलारे यांच्यात सामना रंगणार आहे. 

माण तालुक्‍यात पारंपरिक विरोधक एकत्र; आमदार गोरे गटाची प्रतिष्ठापणाला!

वॉर्ड क्रमांक दोन महिला राखीव जागेवर सुनीता भिलारे यांच्याविरुद्ध भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तानाजी भिलारे यांच्या पत्नी मंगल भिलारे यांच्यात लढत होत आहे. वॉर्ड क्रमांक दोनमध्ये मीना भिलारे, योगिता भिलारे व चित्रा भिलारे अशी तिरंगी लढत होत आहे. हनुमान वॉर्ड क्रमांक तीनमधून माजी उपसरपंच अनिल भिलारे विरुद्ध संजय भिलारे यांच्यात दुरंगी सामना होणार आहे. वॉर्ड क्रमांक तीनमध्ये विद्यमान सरपंच वंदना भिलारे विरुद्ध नंदा भिलारे व स्नेहा भिलारे असा तिरंगी सामना होत आहे. निवडणुकीत माजी सरपंच वंदना भिलारे, उपसरपंच अनिल भिलारे, माजी सरपंच राजेंद्र भिलारे, तानाजी भिलारे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. बाळासाहेब भिलारे यांचे वर्चस्व असणाऱ्या पुस्तकांच्या गावात त्यांचा शब्द प्रमाण मानला जातो; परंतु निवडणूक आली, की हिच मंडळी निवडणुकीच्या आखाड्यात उतरतात आणि निवडणूक झाल्यावर पुन्हा विकासासाठी एकत्र येतात हे या गावचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. बाळासाहेब भिलारे यांच्याबरोबर प्रवीण भिलारे, गणपत पार्टे, तर भाजपकडून तानाजी भिलारे, किसनराव भिलारे, शिवसेनेच्या नितीन भिलारे यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Politics News BJP And Shivsena Challenge In Front Of NCP In Bhilar Gram Panchayat Election