सांगवीत राजे, खासदार गटात अटीतटीची लढत; संजीवराजेंचीही प्रतिष्ठा पणाला!

दीपक मदने
Thursday, 14 January 2021

सांगवीत गेली 15 वर्षे रघुनाथराजे नाईक-निंबाळकर व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली निर्विवाद सत्ता चालत आलेली आहे.

सांगवी (जि. सातारा) : ग्रामपंचायतीची निवडणूक फलटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली राजे गट, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा गट व अपक्ष अशी तिरंगी होत आहे. यामध्ये कोण बाजी मारणार, हे गुलदस्त्यातच आहे.

ढेबेवाडी खोऱ्यात आघाडीत बिघाडी; मुंबईकरांच्या भूमिकेकडे लक्ष  

सांगवीमध्ये गेली 15 वर्षे रघुनाथराजे नाईक-निंबाळकर व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली निर्विवाद सत्ता चालत आलेली आहे. 13 सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीत सहा जागा बिनविरोध झाल्या असून, उरलेल्या सात जागांसाठी 14 उमेदवार रिंगणात उभे आहेत. त्यापैकी वॉर्ड क्रमांक दोनमधून सर्वसाधारण प्रवर्गातून मच्छिंद्र निकम, नागरिकांचा इतर मागास प्रवर्ग महिला राखीवमधून निर्मला वाल्मिकी यजगर, वॉर्ड क्रमांक तीनमधून सर्वसाधारण प्रवर्गातून चांगदेव खरात, सर्वसाधारण महिला प्रवर्गातून शर्मिला जगताप, अनुसूचित प्रवर्गातून सनी मोरे, महिला प्रवर्गातून लक्ष्मी हाके अशी सहा उमेदवारांची निवड बिनविरोध झाली आहे. आता सात जागांसाठी जोरदार लढत सुरू आहे. 

पानिपतावर जिंकण्यासाठी नव्हे तत्वासाठी लढले मराठे; पहिल्यांदाच समोर आलीत धारातीर्थी पडलेल्या सरदारांची नावं

गावात पाच हजार लोकसंख्येपैकी एकूण चार हजार 500 मतदान आहे. उमेदवारांनी मतदारांच्या प्रत्यक्ष गाठी-भेटी, संपर्कावर भर दिला आहे. आपापले उमेदवार निवडून आणण्यासाठी पक्षाच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांची रस्सीखेच सुरू आहे. जिल्ह्याच्या टोकाचे शेवटचे गाव असलेल्या या गावाचा सर्वांगीण विकास या अशा अनेक प्रश्नांवर या वेळेची निवडणूक लढवली जाणार आहे.  

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Politics News Election For Seven Seats In Sangvi Gram Panchayat