
गटातील गारुडी, ढोकळवाडी, हिवरवाडी, गुंडेवाडी व अनफळे या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत, तर तरसवाडी व मुळीकवाडीत प्रत्येकी सहा जागा बिनविरोध झाल्या असून, तेथे केवळ एका जागेसाठी मतदान होणार आहे.
मायणी (जि. सातारा) : परिसरात 15 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून, त्यापैकी पाच पंचायती बिनविरोध झाल्या असून, उर्वरित बहुतांशी ठिकाणी गुदगे विरुद्ध येळगावकर गट अशा पारंपरिक दुरंगी लढती होणार आहेत, तर एक- दोन ठिकाणी गुदगे विरुद्ध येळगावकर व गोरे गटाचा सामना रंगणार आहे.
गटातील गारुडी, ढोकळवाडी, हिवरवाडी, गुंडेवाडी व अनफळे या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत, तर तरसवाडी व मुळीकवाडीत प्रत्येकी सहा जागा बिनविरोध झाल्या असून, तेथे केवळ एका जागेसाठी मतदान होणार आहे. पाचवडमध्ये गुदगे विरुद्ध येळगावकर गटात सामना रंगणार आहे. तेथे मागील निवडणुकीत गुदगे गटाने सर्व नऊ जागा जिंकून येळगावकर गटाला धोबीपछाड केले होते. कलेढोणमध्ये कॉंग्रेस व राष्ट्रवादीत कॉंटे की टक्कर होणार आहे. तेथील भोसले व साळुंखे गटात सामना रंगणार आहे. दोन उमेदवार देऊ केल्याने स्थानिक नेते सुरेशशेठ शिंदे यांनी भोसले अर्थात गुदगे गटाला पाठिंबा जाहीर केला आहे.
पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी गेल्याने शिखर शिंगणापुरची निवडणुक रंगणार
गारळेवाडीत गुदगे विरुद्ध येळगावकर व गोरे गट लढणार आहे. विखळ्यात गुदगे व येळगावकर गट आमने- सामने आले आहेत. तेथे बहुमतासाठी जोरदार रस्सीखेच होणार आहे. कान्हरवाडीत गुदगे विरुद्ध येळगावकर व गोरे गट असा सामना रंगणार आहे. चितळीत गुदगे विरुद्ध येळगावकर गट असा दुरंगी सामना रंगणार आहे. मागील निवडणुकीत दोन्ही गटांच्या सात- सात जागा निवडून आलेल्या होत्या. एका जागेवर समान मते मिळाल्याने चिठ्ठी टाकून गुदगे गटाने सत्ता हस्तगत केली होती. आता पुन्हा गुदगे व विरोधी येळगावकर गटांने कंबर कसली आहे. मोराळ्यात गुदगे यांचेच नेतृत्व मानणारे दोन गट स्वतंत्रपणे आता एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. धोंडेवाडीत सुरेंद्र गुदगे विरुद्ध रणजितसिंह देशमुख यांच्या गटात सामना रंगणार आहे.
सरपंचपद नकाे रे बाबा ! का आमच्या गावाला बदनाम करालायस?
विरोधासाठी विरोध म्हणून उमेदवारी!
दरम्यान, अनेक ठिकाणी केवळ विरोधासाठी विरोध म्हणून उमेदवार उभे करण्यात आले आहेत. बहुतांशी उमेदवार हे मोठी भावकी व राजकीय वारसा, पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबांतून देण्यात आले आहेत. त्यामुळे बहुतांशी उमेदवारांना विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे.
संपादन : बाळकृष्ण मधाळे