एकीमुळेच महाविकास आघाडीचा विजय; माजी मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती

हेमंत पवार
Saturday, 9 January 2021

पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ही महाविकास आघाडीमुळे जिंकता आल्याचे स्पष्ट मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

कऱ्हाड (जि. सातारा) : पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ही महाविकास आघाडीमुळे जिंकता आली. शिक्षक मतदारसंघातून लोकप्रतिनिधी जे निवडून जात होते. त्यांच्यापेक्षा चांगले काम प्रा. जयंत आसगावकर यांच्याकडून होईल, याची मला खात्री आहे. कॉंग्रेस पक्षाचे आमदार म्हणून त्यांच्या मागे पक्ष उभा असेल. सभागृहात शिक्षकांचे प्रश्न मांडताना ते मार्गी लावण्यासाठी कॉंग्रेस पक्ष व महाविकास आघाडी सरकार त्यांच्या पाठीशी असेल, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
 
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे नवनियुक्त आमदार प्रा. जयंत आसगावकर यांचा एसजीएम महाविद्यालय येथे नुकताच श्री. चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. रयत शिक्षण संस्थेचे विश्वस्त ऍड. रवींद्र पवार, महाविद्यालयाचे प्राचार्य मोहन राजमाने, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, सचिन पाटील, नाना जाधव, उदय थोरात, इंद्रजित चव्हाण यांच्यासह महाविद्यालयाचे प्राध्यापक उपस्थित होते.

ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीत दोन गट; सेनेच्या गोटात नाराजी
 
आमदार चव्हाण चव्हाण म्हणाले, "पहिल्यांदाच शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ही पक्षाच्या पाठिंब्याने लढविली गेली. याचे मुख्य कारण जे मागील काही वर्षांत चुकीची प्रवृत्ती पसरत होती. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढविताना विचार जपण्याचे काम केले. शिक्षकांचे प्रश्न प्रा. आसगावकर सभागृहात मांडतील व ते तडीस सुद्धा नेतील. महाविकास आघाडीचा एकत्रित यशस्वी प्रयोग राज्यभर या शिक्षक व पदवीधर निवडणुकीत पाहायला मिळाला. या एकीमुळेच राज्यात नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर व शिक्षक विधान परिषद निवडणुकीत दोन शिक्षक व तीन पदवीधर मतदारसंघात तीन पदवीधर व एक शिक्षक महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले.'' प्राचार्य राजमाने यांनी स्वागत केले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Politics News Jayant Asgaonkar Felicitated By MLA Prithviraj Chavan