भारीच! चार तासात पार केले 72 किलोमीटरचे सायकलिंग; प्राथमिक शिक्षिकेच्या तंदुरुस्तीचे सर्वत्र कौतुक

सुनील शेडगे
Wednesday, 27 January 2021

अलमास मुलाणी या अव्वल दर्जाच्या धावपटू आहेत. जिल्ह्यातील आघाडीच्या धावक म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते.

नागठाणे (जि. सातारा) : प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधताना एका प्राथमिक शिक्षिकेने तब्बल 72 किलोमीटर अंतराचे सायकलिंग यशस्वीपणे पूर्ण केले. प्रबळ इच्छाशक्तीला सराव अन्‌ तंदुरुस्तीची जोड देताना तिने हे अंतर चार तास 40 मिनिटांत पार केले. जिद्दीच्या या आगळ्या यशोगाथेचे विविध स्तरांतून विशेष कौतुक होत आहे. 

अलमास अमर मुलाणी हे या प्राथमिक शिक्षिकेचे नाव. त्या सातारा शहरालगत असलेल्या कोडोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत आहेत. नेले (ता. सातारा) या गावच्या त्या माहेरवाशीण. कोरेगाव तालुक्‍यातील रूई हे त्यांचे सासर. अलमास मुलाणी या अव्वल दर्जाच्या धावपटू आहेत. जिल्ह्यातील आघाडीच्या धावक म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. गेल्या वर्षी मुंबईत आयोजित 42 किलोमीटरची मॅरेथॉन स्पर्धा त्यांनी पाच तास 19 मिनिटांत पूर्ण केली होती. त्यांचे हे यश सर्वत्र कौतुकाचा विषय ठरले होते. 

Wow Good News! आता मोबाइलमध्ये करता येणार मतदान कार्ड डाउनलोड; ही आहे सोपी पध्दत..

72 व्या प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला "इंडिया प्राइड अल्टा रन राइड' या विशेष मोहिमेचे साताऱ्यात आयोजन करण्यात आले होते. मुलाणी यांचा त्यातील सायकलिंग प्रकारात सहभाग होता. पोवई नाक्‍यावरून राजवाडा, मंगळवार तळे अन्‌ त्यानंतर पोलिस मुख्यालयामार्गे पुन्हा पोवई नाका असा सायकलिंगचा मार्ग होता. साडेनऊ किलोमीटरच्या सात फेऱ्या त्यासाठी निश्‍चित करण्यात आल्या होत्या. पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास त्यांनी आपल्या सायकलिंग मोहिमेला आरंभ केला. पहाटे सहाच्या सुमारास त्यांची ही मोहीम यशस्वीपणे पूर्ण झाली. सायकलिंगच्या दृष्टीने किरण गेंजगे, नीलेश माने यांचे सहकार्य, तंत्रज्ञानातील मार्गदर्शन मोलाचे ठरल्याचे त्या सांगतात. या उपक्रमात विजया कदम, वैशाली गुरव, जागृती फाळके, सुप्रिया मोरे, रमा सरमुकादम, दीपा महाजनी, अनुराधा केंजळे या सहकाऱ्यांची महत्त्वपूर्ण सोबत लाभल्याचे त्यांनी या वेळी नमूद केले. यापैकी काही जणी धावण्यात, तर काही सायकलिंगमध्ये सहभागी झाल्या होत्या. 

Hows The Josh! निपाणीच्या पोरीनं जिंकलं दिल्लीचं तख्त; सुप्रियाची सैन्य दलात फिनिक्स भरारी

धावण्यातील यशाचा आलेख 

अलमास मुलाणी यांनी अलीकडच्या काळात 21 किलोमीटर धावण्याच्या सात मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण केल्या आहेत. सातारा हिल मॅरेथॉन, माणदेश मॅरेथॉन स्पर्धेतही त्यांनी भरीव यश संपादन केले आहे. सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबई, गोवा येथील स्पर्धांतूनही त्या सहभागी झाल्या आहेत. 

‘How’s The Josh’! सातारा जिल्ह्यातील शेतकरी कन्या सैन्य दलात; आसाम रायफलमध्ये निवड

"रात्रीच्या वेळी सलग 72 किलोमीटर सायकलिंग करणे ही बाबच मुळी आव्हानात्मक. मात्र, उपक्रमाचे उत्तम नियोजन, सरावातील सातत्य अन्‌ सहकाऱ्यांचे प्रोत्साहन यामुळे यश दृष्टिक्षेपात आले. एक स्त्री म्हणून हे यश संपादन केल्याचा अभिमानही वाटला.' 
-अलमास मुलाणी, प्राथमिक शिक्षिका 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Positive News The Primary Teacher Completed 72 Kilometers Of Cycling