आनंदाची बातमी...प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांना आता चक्क डॉक्‍टर!

विलास खबाले 
रविवार, 2 ऑगस्ट 2020

प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांत आजवर रुग्णांना अपेक्षित अशी आरोग्यसेवा मिळत नव्हती. त्यासाठी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांत त्यांना पाठवले जात होते. धावपळीत बरेचदा रुग्ण तिकडे न जाता खासगीकडे रुग्णालयात वळत होते. परिणामी आर्थिक भुर्दंडासह परवड होत होती.

विंग (जि. सातारा) : आरोग्याचा दर्जा उंचावण्यासाठी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांना आता चक्क डॉक्‍टर अर्थात समुदाय आरोग्य अधिकारी (सीएचओ) दिले असून, आरोग्यसेवेत ते दाखल झाले आहेत. विंगसह विभागातील चार तर कऱ्हाड तालुक्‍यांतील 31 उपकेंद्रांसाठी त्यांची नियुक्ती झाली आहे. 

प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांत आजवर रुग्णांना अपेक्षित अशी आरोग्यसेवा मिळत नव्हती. त्यासाठी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांत त्यांना पाठवले जात होते. धावपळीत बरेचदा रुग्ण तिकडे न जाता खासगीकडे रुग्णालयात वळत होते. परिणामी आर्थिक भुर्दंडासह परवड होत होती. मात्र, आता यापुढे सर्वसामान्य रुग्णांना सहज, सुलभ अणि तत्काळ आरोग्यसेवा उपकेंद्रांच्या ठिकाणीच मिळावी, या उद्देशाने केंद्र शासनाने आरोग्य उपकेंद्रांना चक्क डॉक्‍टर्स दिले आहेत. समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून त्यांच्या नेमणुका केलेल्या आहेत. तत्पूर्वी त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. या नियुक्‍त्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केलेल्या आहेत. 

कोळे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत चार उपकेंद्रांच्या ठिकाणी नेमणूक झालेले डॉक्‍टर दररोज सेवेत हजर होऊ लागलेले आहेत. कऱ्हाड तालुक्‍यामध्ये एकूण 11 प्राथमिक आरोग्य केंद्रे असून, त्याअंतर्गत 64 उपकेंद्रे आहेत. तूर्तास तालुक्‍यात एकूण 30 उपकेंद्रांसाठी डॉक्‍टरांच्या नेमणुका झालेल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना तत्काळ आरोग्यसेवा व असंसर्गीय आजाराची तपासणी व निदान होऊ लागले आहे. रक्तदाब, रक्तातील साखर 
व इतर आजारांची तपासणी व निदान आता उपकेंद्रांच्या ठिकाणी होणार आहे. शासनाचा त्यामागचा हा उद्देश आहे. सर्वसामान्य रुग्णांची परवड थांबून वेळ आणि पैशाची बचत व्हावी, हाही उद्देश त्यामागचा आहे. 

""प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांमध्ये ताप, सर्दी, खोकला आदी सर्वसाधारण आजारांसह रक्तदाब, मधुमेह यांसारख्या आजाराची तपासणी करून निदान, मोफत औषधोपचार केले जाणार आहेत. असाह्य आणि गंभीर आजाराच्या रुग्णांना मात्र पुढे पाठवले जाणार आहे. शासनाकडून येणाऱ्या सर्व प्रकारच्या आरोग्यसेवा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचविण्याचे काम आम्ही पाहणार आहोत. लोकांनीदेखील आम्हाला सहकार्य करावे.'' 

-डॉ. अर्चना यादव, 
समुदाय आरोग्य अधिकारी, प्राथमिक उपकेंद्र अर्थात आरोग्यवर्धिनी उपकेंद्र, विंग 

संपादन : पांडुरंग बर्गे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Primary Health Sub Centers Now Have Doctors