कऱ्हाडला खासगी डॉक्‍टर देणार सरकारी दरात सेवा!

सचिन शिंदे 
Sunday, 20 September 2020

पहिल्या टप्प्यात कऱ्हाड शहरात 15 डॉक्‍टरांचे पथक आले आहे. त्यांनी सरकारी दरात येथील कऱ्हाड हॉस्पिटलमध्ये त्यांची सेवाही सुरू केली आहे. त्यानंतर शासकीय कोविड सेंटरमध्ये त्यांचीच दुसरी टीम कार्यरत राहणार आहे,

कऱ्हाड (जि. सातारा) : सरकारी यंत्रणेच्या वैद्यकीय स्टाफच्या मर्यादा आहेत. त्यावर पर्याय म्हणून सातारा जिल्ह्यातील ठाणे भागात तज्ज्ञ डॉक्‍टर्स कार्यरत आहेत, त्यांनी येथे येऊन सेवा देण्याचे ठरवले आहे. त्यानुसार त्यांनी कऱ्हाडमध्ये त्यांच्या स्टाफसह सेवा सुरू केली आहे. ती सरकारी दरात आहे. यशवंतराव चव्हाण बहुद्देशीय हॉलमध्येही होणाऱ्या कोविड सेंटरमध्ये त्यांचाच डॉक्‍टर्स व अन्य वैद्यकीय स्टाफ सेवा देणार आहे, अशी माहिती माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी "सकाळ'ला दिली. 

जिल्ह्यात वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी डॉक्‍टर्स उपलब्धीचा प्रश्न मोठा गंभीर आहे, असे सागूंन आमदार चव्हाण म्हणाले, ""या भागातील डॉक्‍टर एकत्रित येऊन केअर सेंटर सुरू करतील, अशी काही स्थिती नाही. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील काही डॉक्‍टर्स व त्यांची टीम ठाणे जिल्हा परिसरात काम करते. त्यांची माझ्याकडेही माहिती होती. डॉक्‍टर्सनी मुंबईत असताना प्रत्यक्षात माझी भेट घेतली. त्यांनी कोरोनासाठी सातारा जिल्ह्यामध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार त्यांच्याशी कऱ्हाड येथील कऱ्हाड हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाची बैठक घालून दिली. त्यानंतर ते हॉस्पिटल कोरोनासाठी राखीव करण्यात आले. त्यामुळे पहिल्या टप्प्यात कऱ्हाड शहरात 15 डॉक्‍टरांचे पथक आले आहे. त्यांनी सरकारी दरात येथील कऱ्हाड हॉस्पिटलमध्ये त्यांची सेवाही सुरू केली आहे. त्यानंतर शासकीय कोविड सेंटरमध्ये त्यांचीच दुसरी टीम कार्यरत राहणार आहे, त्यामुळे 30 हून अधिक तज्ज्ञ डॉक्‍टर्स कोविडचे काम करणार आहेत.'' 

श्री. चव्हाण म्हणाले, ""यशवंतराव चव्हाण बहुद्देशीय हॉलमध्ये 50 बेडचे हॉस्पिटल सुरू करत आहोत. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. बेड वाढविण्याची गरज लक्षात घेऊन पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्यासोबत बैठकही घेतली आहे. त्यातून एक हजार 411 बेड पूर्ण होत आहेत. बेड वाढवता येतील पण त्यासाठी स्टाफचा प्रश्न होता. ती गरज लक्षात घेऊन मुंबईतील कंपन्यांसोबत चर्चा केली. त्यानुसार आपल्या जिल्ह्यातील मात्र ठाणे परिसरात काम करणारे काही तज्ज्ञ डॉक्‍टर्स लोकांच्या दोन टीम कऱ्हाडला रुजू करत आहोत. त्यातील एक टीम कऱ्हाड हॉस्पिटल येथे कार्यरत आहे. त्याशिवाय येथे वैद्यकीय उपकरणांचीही गरज आहे. ती लक्षात घेऊन सीएसआरच्या माध्यमातून निधी किंवा वैद्यकीय उपकरणे मिळवण्यासाठी मुंबईत कंपन्यांसोबत बैठक घेतली आहे. त्यांच्या प्रयत्नातून कऱ्हाडला तीन व्हेंटिलेटर आणले आहेत. अद्यापही सात व्हेंटिलेटर्स येतील. त्याशिवाय काही उपकरणेही सीएसआर निधीतून येणार आहेत. 

""सध्याची कोरोना महामारीची स्थिती अत्यंत भयानक आहे. नागरिकांनी आजार अंगावर न काढता तपासून घ्यावे. त्याशिवाय योग्य ती काळजी घ्यावी. ग्रामीण भागात ज्येष्ठ नागरिकांना ऑक्‍सिजन कमी होण्याचे प्रमाण वाढते आहे. ती गोष्ट लक्षात घेऊन शासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.'' 
-पृथ्वीराज चव्हाण, 
आमदार 

संपादन : पांडुरंग बर्गे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Private Doctors To Provide Services To Karad At Government Rates