धरणग्रस्तांची पुनर्वसन ठिकाणीही परवड कायम, वाचा वहागावकरांची व्यथा...

Satara
Satara

भिलार (जि. सातारा) : महू धरणात पूर्णपणे बाधित झालेल्या वहागाव (ता. जावळी) येथील धरणग्रस्तांची पुनर्वसित ठिकाणीही अद्याप परवड सुरू असून, शासकीय यंत्रणा मात्र निद्रिस्तावस्थेच सोंग घेत असल्याने ग्रामस्थ हतबल झाले आहेत. 

कृष्णा पाटबंधारे विभागांतर्गत महू धरण प्रकल्पाचा घाट घातला गेला. त्यात वहागाव हे पूर्णपणे बाधित झाले. या गावाचे खंडाळा तालुक्‍यातील अजनुज, अहिरे, सुखेड, म्हावशी व इतरत्र पुनर्वसन करण्यात आले. पूर्वी एकत्र असणारे ग्रामस्थ विखुरले गेले. धरण अद्यापही पूर्ण न झाल्याचे शासकीय यंत्रणा सांगत आहे. गेली 20 वर्ष हे धरणग्रस्त आपल्या वाडवडिलांच्या हक्‍काच्या जमिनी सोडून पुनर्वसित ठिकाणी दाखल झाले. यातील अनेक कुटुंबांना अद्याप लाभ मिळालेला नाही. शासन दरबारी ते हेलपाटे मारत आहेत, तर दुसरीकडे पुनर्वसित ठिकाणी या प्रकल्पग्रस्तांना मूळ मालक दमदाटी करून जमीन ताब्यात देत नाहीत. काहींना राहण्यासाठी प्लॉट मिळाले आहेत, तर त्या ठिकाणाहून अनेक मैल लांब जमिनी मिळाल्या आहेत. त्यामुळे या ग्रामस्थांना 20 वर्षांत आपले बस्तान बसवता आलेले नाही, हे मोठे दुर्दैव आहे.

आपले संसार पुनर्वसित ठिकाणी सावरताना अनेक संकटांचा सामना या लोकांना परक्‍या जागेत करावा लागत आहे. या लोकांना मिळालेल्या जागेतूनच धोम-बलकवडीचा कालवा गेला आहे. मिळालेल्या खडकाळ ओसाड तुटपुंज्या जागेतून हा कालवा गेल्याने त्यातील बरीचशी जमीन याच लोकांची गेली. त्यांना अद्यापही नोटिसा नाहीत, की मोबदला नाही. कशीतरी शासनाशी भांडून जमीन पदरी पडली आणि त्यातही हे दुसरे संकट समोर आले. अनेक लोकांनी या जमिनी कसल्याही नाहीत. ते जुन्या गावाकडे असताना सर्व्हे झालेला कालवा पूर्णही झाला, तरी त्यांना साधी नोटीसही दिली नाही. त्यामुळे हे ग्रामस्थ आपल्या जागेत पोचले तेव्हा त्यांना परिस्थिती दिसल्यावर ते अचंबित झाले आहेत. ना नोटीस ना मोबदला डोक्‍याला हात लावण्याशिवाय कुठलाही पर्याय त्यांच्याकडे नाही. आगोदर जमिनीसाठी 15 वर्ष शासन दरबारी हेलपाटे, आता त्याच मिळालेल्या जमिनीत बिनधास्तपणे त्यांनीच काढलेल्या जमिनीच्या नुकसान भरपाईसाठी पुन्हा उंबरे झिजवण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. 

सुखेड (ता. खंडाळा) येथे पुनर्वसित झालेल्या शंकर तुकाराम रांजणे, सुमन वसंत गोळे, लक्ष्मी शिवराम रांजणे, दत्तात्रय गणपत पवार, महादेव सावळा रांजणे, विजय नारायण भिलारे, तर म्हावशी येथील बळवंत रांजणे यांना अद्यापही शासनस्तरावरून नोटिसा नाहीत, की कालव्यामध्ये घेतलेल्या जमिनीचा मोबदला नाही. या लोकांची मोबदला रक्कम तातडीने अदा करण्याची व्यवस्था करावी, अशी आर्त हाक या ग्रामस्थांनी केली आहे. 


""शासनाने आम्हाला थांगपत्ता लागू न देता महू धरणातून विस्थापित केले आणि येथेही कालव्याच्या नावाखाली आमची जमीन ताब्यात घेतली नव्हे, तर कालवाही पूर्ण केला. या जमिनीसाठी आम्हाला ना नोटीस, ना मोबदला. ठेकेदाराने बिनधास्तपणे जमिनीत डोजर लावला. हा अन्याय आहे. जागेसाठी 20 वर्ष लढा देताना यापुढेही आम्ही लढाच देत जीवन कंठायच का? या शेतकऱ्यांना तातडीने मोबदला द्यावा अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल.'' 
- प्रकाश रांजणे, अहिरे 

संपादन : पांडुरंग बर्गे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com