
सातारा : कवठेतील दुरुस्तीची कामे त्वरित करा
कवठे : कवठे परिसरात मुसळधार पावसाने दीडशे घरात पाणी जाऊन मोठे नुकसान झाले. महामार्गावरील भुयारी मार्गात पाणी वाहून जाण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याने रस्त्याखालील भुयारी मार्ग व सेवारस्ता सातत्याने पाण्याखाली जाऊन नागरिकांना येण्या- जाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दुरुस्तीची कामे त्वरित करावीत, अशा सूचना खासदार श्रीनिवास पाटील यांनी केल्या.
मुसळधार पावसामुळे डोंगर भागातून ओढे नाले, तसेच शेतातील पाण्याचे लोट गावात व वाडीवस्त्यांवरील घरात शिरले होते. पाण्यामुळे अनेकांचे घरगुती साहित्य व अन्नधान्य भिजून मोठे नुकसान झाले. महामार्ग व पुलासंदर्भात ग्रामस्थांना निर्माण झालेल्या अडचणी, तसेच नुकसान भरपाईची पाहणी करण्यासाठी खासदार पाटील, आमदार मकरंद पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, तहसीलदार रणजित भोसले, उपविभागीय कृषी अधिकारी गोरड, तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे, गटविकास अधिकारी नारायण घोलप, तलाठी सुशील राठोड, महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार या वेळी उपस्थित होते.
या वेळी ग्रामस्थांनी महामार्गावरील निर्माण झालेल्या विविध अडचणी निदर्शनास आणून दिल्या. खासदार श्रीनिवास पाटील व आमदार पाटील यांनी महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यांना कवठ्यातील महामार्गावरील भुयारी पुलाची निर्मिती खोल खड्ड्यात व भौगोलिकदृष्ट्या दोन्ही बाजूने चुकीची झाल्याने या ठिकाणी अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. गाव महामार्गाच्या दोन्ही बाजूला असल्याने परिसरातील नागरिकांना येथून जाताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वीरबाग सुरूर येथील शाळेत पुलाखालून जाताना विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो, यासाठी या ठिकाणी तातडीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचना केल्या.
या वेळी आमदार पाटील यांनी तहसीलदार रणजित भोसले, तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे, गटविकास अधिकारी नारायण घोलप यांच्याकडून घरांची, तसेच शेतीच्या नुकसानाबाबतची माहिती घेतली. नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर कराव्यात, अशा सूचना केल्या.
Web Title: Satara Repair Work Shell Immediately
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..