दोन घागरी पाण्यासाठी दिवसभर रस्त्यावर!

patan
patan

ढेबेवाडी (जि. सातारा) : दोन घागरी पाण्यासाठी भरपावसात अक्षरशः दिवसभर प्रतीक्षा करण्याची वेळ मराठवाडी धरणग्रस्तांवर आली आहे. पाटबंधारे विभागाने तेथे टॅंकर बंद करून थेट पाइपलाइनव्दारे केलेली पाणीपुरवठ्याची व्यवस्था ही नियोजनाच्या अभावामुळे धरणग्रस्तांसाठी डोकेदुखी बनली असून संबंधितांच्या कारभाराबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. 

मराठवाडी धरणात मुबलक पाणीसाठा असला तरी धरणाच्या काठावरील उमरकांचनच्या धरणग्रस्तांवर मात्र अक्षरशः पाणी-पाणी करण्याची वेळ आली आहे. सांडव्याच्या बांधकामुळे गेल्यावर्षी धरणात जवळपास दुप्पट पाणीसाठा झाल्याने पाण्याची झळ पोचलेल्या उमरकांचनमधील खालच्या आवाडातील अनेक धरणग्रस्त कुटुंबांना पाटबंधारे विभागाने त्या परिसरातच उभारलेल्या निवारा शेडमध्ये हलविले आहे. अनेक अडचणींशी सामना करत वर्षभरापासून शेडमध्ये वास्तव्यास असलेल्या या कुटुंबांसह खालच्या आवाडातीलच आणखी काही कुटुंबांना पाटबंधारे विभागाने काही महिने टॅंकरने पाणीपुरवठा केला. मात्र, अलीकडे नजीकच्याच पुनर्वसित गावठाणात पाणीपुरवठ्याची विहीर व पाणी साठवण टाकीचे बांधकाम पूर्ण झाल्याने टॅंकरऐवजी तेथूनच पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी पाण्याच्या टाकीपासून निवारा शेडपर्यंत पाइपलाइन करून टाक्‍या बसविल्या आहेत. 

खालच्या आवाडातील जुन्या घरात वास्तव्यास असलेल्यांसह निवारा शेडमधील कुटुंबांसाठी पाटबंधारे विभागाने केलेली पाणीपुरवठ्याची ही व्यवस्था आता त्यांच्यासाठीच "असून अडचण नसून खोळंबा' बनली आहे. वाहने गेल्याने उघड्यावरील पाइपलाइन ठिकठिकाणी फुटली आहे. गावठाणात पाण्याची टाकी भरून नियमित पाणी सोडण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था नाही. पहाटे, सकाळी, दुपारी, सायंकाळी कधी पाणी येईल, हे सांगता येत नसल्याने दिवसभर टाक्‍यांजवळ लागलेल्या घागरींच्या लांबच लांब रांगा आणि रस्त्याशेजारी त्याची राखण करत बसलेले धरणग्रस्त नित्य दिसून येत आहेत. 

हुसकावण्याचा प्रयत्न तर नाही ना? 
पुनर्वसित गावठाणातील टाकीत साठवलेले शेवाळयुक्त अस्वच्छ पाणी सोडले जात असले तरी त्यातही नियमितता नाही. एका कुटुंबाच्या वाटणीला कसेतरी दोनच घागरी पाणी येते. त्यामुळे पाण्यासाठी अन्यत्र भटकंती सुरूच असल्याचे धरणग्रस्तांनी सांगितले. खालचे आवाडातील अनेक कुटुंबे सांगली जिल्ह्यातील माहुली येथे पुनर्वसित होणार असली तरी विविध प्रलंबित मागण्यांमुळे त्यांनी अजून मूळगाव सोडलेले नाही. मागण्यांसंदर्भात शासनस्तरावर पाठपुरावा सुरू असताना पाटबंधारे विभाग अशा प्रकारे त्रास देवून आम्हाला हुसकवण्याचा तर प्रयत्न करत नाही ना? अशी शंकाही धरणग्रस्त उपस्थित करत आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com