esakal | डॉक्‍टर, इतकं खरं बोलायचं नसतं हो...!
sakal

बोलून बातमी शोधा

Dr. narendra_Dabholakr

20 ऑगस्ट ही तारीख आठवली, की आमच्या अंगावर शहारे येतात. कारण तुम्ही जाऊन सात वर्षे पूर्ण झालीत. त्यादिवशी पुण्यातल्या ओंकारेश्वर पुलावर तुम्ही रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. तुमचे मारेकरी तुम्हाला मारून निघून गेले होते. तुम्ही मात्र हसत हसत जीव सोडला होता...कारण असं काही होईल, याची पूर्वकल्पना तुम्हाला असावीच. "जे ना बोलायचे तेच मी बोलतो, मीच माणूस नाही भला यारहो...' या सुरेश भटांच्या ओळी तुम्ही खऱ्या ठरवल्या.

डॉक्‍टर, इतकं खरं बोलायचं नसतं हो...!

sakal_logo
By
सचिन सकुंडे

प्रिय डॉ. दाभोलकर साहेब, 

20 ऑगस्ट ही तारीख आठवली, की आमच्या अंगावर शहारे येतात. कारण तुम्ही जाऊन सात वर्षे पूर्ण झालीत. त्यादिवशी पुण्यातल्या ओंकारेश्वर पुलावर तुम्ही रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. तुमचे मारेकरी तुम्हाला मारून निघून गेले होते. तुम्ही मात्र हसत हसत जीव सोडला होता...कारण असं काही होईल, याची पूर्वकल्पना तुम्हाला असावीच. "जे ना बोलायचे तेच मी बोलतो, मीच माणूस नाही भला यारहो...' या सुरेश भटांच्या ओळी तुम्ही खऱ्या ठरवल्या. लोकप्रिय होणं, टाळ्या कमावणं या जगात फार सोपं आहे. पण, तुम्ही सतत चिकित्सा करत राहिलात. तुम्हाला खटकणाऱ्या गोष्टींची...विज्ञानवादातून अनेक भोंदूबाबांची तुम्ही पिसं उखडलीत. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कायम शेवटच्या श्‍वासापर्यंत खरं बोलत राहिलात. पण, डॉक्‍टर या जगात ठीकठाक जिवंत राहण्यासाठी एवढं खरं बोलून चालतं का हो..?  म्हणून आज थोडी तक्रार करायची आहे तुमच्याकडे... 

सांगा डॉक्‍टर, का खेळला तुम्ही स्वतःच्या अनमोल आयुष्याशी? का मृत्यूला कवटाळून घेतलंत? घरादाराचा त्याग करून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत का फिरत राहिलात ? या जगात बुद्धिवादानं चालणं ही विषाची परीक्षा, आगीचे खेळ आहेत, हे माहीत असूनही एकाकीपणे का झुंजत राहिलात? तुमच्या बलिदानानंतर खूप काही बदलून गेलंय असंही नाही. डॉक्‍टर, श्रद्धा-अंधश्रद्धेच्या सीमारेषांची इथे सरमिसळ झाली आहे. श्रद्धा हीच हळूहळू अंधश्रद्धा होत चाललीय. लोकांना नेहमी काहीतरी अदृश्‍य शक्तीचा आधार हवाय. भीती विकून लोकं धर्माचा धंदा करू लागले आहेत. काहींनी मेंदू काबीज करून त्यांना कधीच गुलाम करून टाकलंय. 

अहो, इथे माणसाची धर्म-जात हीच आदिम चिकट आयडेंटी ठरलीय. माणूसपणाला कवडीची किंमत उरली नाही. मानवतावाद आहेच, की सर्व धर्मग्रंथांत. पण, तो फक्त आपल्या धर्म-जातीपुरता मर्यादित आहे. धर्माचा अश्‍शील गाभा कर्मकांडाच्या फोलकटांनी व्यापलेला आहे. त्याच फोलकटांना आम्ही आयुष्याची खरी संपत्ती समजू लागलोय. मुदलात अशी फोलकटं फेकून द्यायची असतात. जाळून त्यांचा निचरा करायचा असतो. पण, आम्ही फार खोलवर बिगडलेलो आहोत.  जातीचा अभिमान आणि सत्तेचा माज तर आमच्या नसानसांत भिनलेला आहे. या अशा पारंपरिक बेगडी-रुढी एका झटक्‍यात मिटवणं सोपं आहे का हो?  बरं, तुम्ही गेल्यानंतरही तुमच्या हत्येचं समर्थन करणारे लोक आहेतच की इथं. आज इथे तुमची कोणालाच किंमत नाहीये. 

कार्यकर्त्यांनो, तुम्ही तुमचा धर्म-देव सोडून माझ्यामागे येऊ नका. असंही तुम्ही म्हणाला होता. तुमचा धर्म-देवाला कधीच विरोध नव्हता. त्यातल्या भोंदूगिरीला विरोध होता. धर्मातल्या शोषणाला विरोध होता. पण दाभोलकर म्हटलं की, आज तुमच्या नावासमोर धर्मविरोधी इतकाच 'टॅग' लागतोय. दाभोलकर म्हणजे अंधश्रद्धेची लक्‍तरं सोलणारे...धर्म-जात यांच्या झापडी उठवून लोकांना विवेकाची शिकवण देणारे...स्वतःकडचा गहाण मेंदू वापरायला लावून विवेकाची फोडणी देणारे...हजारो व्यसनाधीशांना माणसात आणणारे...तुमच्या विवेकवादी चळवळीचं हे इतकं व्यापक कार्य कधी पुढे आलंच नाही...मग का करत राहिला तुम्ही हे सारं...समाजासाठी? 

धर्म, जातीचा कंड जिरवण्यासाठी एकमेकांची माथी फोडतो तो समाज...बुवाबाजी, करणी अशा भोंदूगिरीच्या कच्छपी पडत पोटच्या पोरांचाही बळी देतो तो समाज...धर्मनिरपेक्ष म्हणता म्हणता हिंदू- मुस्लिम प्रोपेगंड्यात अडकून स्वतःच्या विकासाचा स्वतःच खून करतो तो समाज...का शाळा शिकूनही अडाणचोटपणाने जगत राहतो तो समाज. आणि डॉक्‍टर, या समाजाने शेवटी तुम्हाला काय दिलं...तर केवळ एक क्रूर मृत्यूच ना..! 

अहो, तुम्ही हे काम इतक्‍या अव्याहतपणे का करत गेला असा प्रश्न पडतो. तुमचा विवेकवादही मान्य आहे. पण, लोकांनाच इथे बदलायचं नाही. तेव्हा का तुम्ही आपला जीव गमावून बसलात...? त्यापेक्षा आयुष्यभर डॉक्‍टरकी करायची ना. भरमसाट पैसे कमवायचे. चांगले डॉक्‍टर होता. बायको डॉक्‍टर होती. मुलं ही ठीकठाक शिकलेली होती. तर बसायचं ना शांत ऐषोराम आणि सुखविलास उपभोगत. पण, तुम्ही तर आयुष्यभर लोकांच्या अंधश्रद्धेच्या गॅंगरिनची सर्जरी करत राहिला. बुवाबाजी करणाऱ्यांचे मुखवटे वैज्ञानिक प्रयोगांनी फाडून टाकलेत. लिंबू, बाहुली अडकवून मुंजाला वडावर रुजविणाऱ्यांना वठणीवर आणलंत. करणीला तुम्ही धरणीत गाडलंत. नर-बळी, देवाच्या नावानं कोंबडं- बकरी कापणाऱ्यांना तुम्ही अद्दल घडवलीत. लोकांना अंगात येण्याच्या प्रकारातलं शास्त्र समजावून सांगितलं.  

संत गाडगेबाबा म्हणतात, देवळात देव नाही, देव मनात राहतो. देवळात पुजाऱ्याचं पोट राहतं. हेही तुम्ही अनेक व्याख्यानांत ठामपणे म्हणायचा. पण, लोकांना एवढं शास्त्रोक्त सांगितलेलं पटत नाही. त्यांना रंजक कथा हव्या असतात. मेंदूला अफूचा ऑर्गजम हवा असतो. म्हणून डॉक्‍टर, तुमचं बलिदान एका बाजूला निरर्थक वाटू लागतं. दुसऱ्या बाजूला चीड, स्वतःचा लाज वाटून रागही येतो. नैतिकतेच्या भेदरट पीछेहाटीबद्दल तीव्र अस्वस्थही वाटू लागतं. डॉक्‍टर, आम्ही समाज म्हणून माफ करा म्हणण्याच्या लायकीचेही नाहीच आहोत. स्मृतिदिन साजरा करण्यापूर्वी आडवं आलेल्या मांजरांमुळं सात पावलं माघारी चालणारे. आम्ही शनिवारी नखं काढायलाही न धजावणारे. आम्ही सारेजण भंपक तर आहोतच. पण, तुमचे खरे मारेकरी आहोत...! 

अहो, तुमच्या जाण्याने हमीद आणि मुक्ताने बाप हरवलाय. शैलाजींनी एक पती हरवलाय. त्याहून जास्त आम्ही सगळ्यांनी एक विवेकवादी मेंदू हरवलाय. आम्हाला माहीतेय, माणूस मेल्याशिवाय त्याची किंमत होत नाही. तुमच्या स्मृतिदिनी तुमची आठवण एवढ्या व्यापकपणे म्हणूनच येतेय. पण, तुमच्यानंतर कॉ. पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांनाही तुमचीच वाट धरावी लागली. याचा खूप 'तीव्र' खेद वाटतोय. आमची पात्रता नसली तरीही आमच्या बेगडीपणाच्या आतला एक आशावादी वैचारिक अभिलाषेचा कण आज तुम्हाला तरीही ओरडून सांगतच राहतो.

डॉक्‍टर, तुमच्यासारखी माणसं मरत नसतात. जसे गांधी बाबा गोळी खाल्ल्यावरंही मेले नाहीत. तुकोबाराय, संत रोहिदास या माणसांना मारूनही ती माणसं आपल्यातून गेली नाहीत. तितकेच चिवट खोडाचे तुम्ही आहात. तुमच्यासारखे लोक गोळ्या खाऊनही उलट प्रखरपणे जिवंत होतात. कारण गांधी जसा विचार आहे. तसा दाभोलकर हाही एक विचार आहे. बंदुकीच्या गोळीची क्रांती तुमच्या अहिंसक उत्क्रांतीपुढे शतकानुशतके निभाव धरू शकणार नाही. हेच त्रिकालाबाधित सत्य आहे.  

तुमच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त तुम्हाला अभिवादन करून तुमच्या विचारांच्या ऋणातून उतराई होणार नाही. कारण अभिवादनाचे कर्मकांड तुम्हालाही रूचणार नाहीत. कारण, तुम्हीच म्हणायचा उपरी कर्मकांड माणसाच्या आतल्या बुद्धीवादाला पोखरून काढते. आज फक्त एवढंच सांगू, की आम्ही तहहयात झुंजत राहू, या विशाल सागराएवढ्या बहुमतवादी अंधश्रद्धांशी.. एखाद्या प्रवाळाप्रमाणे..! तुकोबाराय म्हणत, सत्य असत्याशी मन केले ग्वाही। मानियले नाही बहुमता!! ज्या दिवशी इथला हर एक व्यक्ती विवेकाने वागेल, बाबा बुवाच्या कर्मकांडाला सवाल विचारेल, त्याच दिवशी तुमचं कार्य सफल होईल. डॉक्‍टर, तुम्ही देव नव्हता, महापुरुष होता...या दिवशी इतकंच सांगायचंय. या समाजाला तुम्हाला  समजायला आणखीन किमान शंभर वर्षे जावी लागतील. 

संपादन - सुस्मिता वडतिले 
 

loading image
go to top