"या' प्रसिद्ध धबधब्यावर पोलिस बंदोबस्ताची आवश्‍यकता

Satara
Satara

तारळे (जि. सातारा) : सडावाघापूर (ता. पाटण) येथील उलटा धबधबा (रिव्हर्स पॉइंट) हुल्लडबाजांच्या रडारवर आला आहे. काल उंब्रज पोलिसांनी हुल्लडबाजांवर कारवाई केली. या कारवाईचे कौतुक होत आहे. मात्र, या कारवाईत सातत्य राहणार का, असा सवालही उपस्थित झाला आहे. तीन महिने येथे पोलिस बुथ उभारले तरच येथील हुल्लडबाजीला अटकाव होईल, अशी मते व्यक्त होत आहेत. 

सडावाघापूर परिसरावर निसर्गाने मुक्तहस्ते नैसर्गिक उधळण केली आहे. धुक्‍यात हरवलेल्या गगनचुंबी पवनचक्‍क्‍या, रस्ता, विस्तीर्ण पठार, दाट धुक्‍याची दुलई, हिरवागार गवताचा गालिचा, सोसाट्याचा गार वारा, मन व तन चिंब करणारा पाऊस, घाटातून फेसाळत येणारे छोटे-मोठे धबधबे, पठारावरून दिसणारे निसर्गाचे विलोभनीय दृश्‍य, हिरवाईने नटलेल्या डोंगररांगा, खोलच खोल दरी असे प्रसन्न करणारे वातावरण प्रत्येकाच्या मनाला सुखद आनंद देते. अशा स्थळाची भुरळ पडली नाही तरच नवल. 

या पर्यटनस्थळाला हुलल्लडबाजांचे ग्रहण लागू पाहत आहे. शांततेचा भंग करत मोठ्याने लावलेली गाड्यांमधील गाणी, त्यावर कपडे काढून थिरकणारी, बऱ्याच वेळा मद्यपान करून तर काही वेळा मद्याच्या बाटल्या हातात व डोक्‍यावर घेऊन बीभत्सपणे नाचणारी तरुणाई या पर्यटनस्थळाला गालबोट लावीत आहेत. याचा महिला पर्यटक व कुटुंबांसहित आलेल्यांना त्रास होतो. दुचाकीवरून ट्रिपलसीट येणे, घाटातून भरधाव गाडी हाकणे तसेच रस्त्यात गाड्या लावून नाचणे, वाहतुकीला अडथळा आणणे, यामुळे प्रवासादरम्यानही यांचा त्रास जाणवतोच. शिवाय स्थानिकांना दमदाटी करणे, गुरांकडे जाणाऱ्या मुली व स्त्रियांकडे वाकड्या नजरेने पाहणे अशांमुळे मार्गातील गावे व सडावाघापूरकर वैतागले आहेत. अशांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी वर्षापासून होत आहे. त्यासाठी येथे पर्यटन काळात पोलिस केंद्र उभारून बंदोबस्त ठेवावा, अशी अपेक्षा पर्यटक व स्थानिक बोलून दाखवत आहेत. 

काल उंब्रज पोलिसांनी हुल्लडबाजांना चाप लावण्याचा प्रयत्न केला. पठारावर दंडात्मक कारवाई केली. शिवाय दोन गाड्यांवर गुन्हे दाखल केले. या कारवाईचे समाधान असले तरी या कारवाईत सातत्य राहणार का, हा खरा सवाल आहे. एक दिवस कारवाई होते व पुन्हा येरे माझ्या मागल्या... अशा अवस्थेने स्थानिकांच्यात नाराजी आहे. कायमस्वरूपी बंदोबस्त ठेवण्याची गरज आहे, अन्यथा एक दिवसाच्या कारवाईने हुल्लडबाजांवर नियंत्रण मिळविणे अवघड आहे. 

""हुल्लडबाजांचा स्थानिकांना प्रचंड त्रास होतो. महिला, मुलीदेखील सुटत नाहीत. दमदाटी नित्याचीच आहे. पाटण पोलिसांना बंदोबस्त देण्यासाठी पत्र दिले आहे. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. पर्यटनकाळात कायमस्वरूपी पोलिस बंदोबस्त असावा.'' 

बापूराव दांडिले, 
सरपंच, सडावाघापूर 

संपादन : पांडुरंग बर्गे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com