बेरोजगार आहात? काळजी करू नका, प्रशिक्षणादरम्यान मिळणार पगार अन्‌ त्यानंतर नोकरीची हमी!

पांडुरंग बर्गे
शनिवार, 11 जुलै 2020

डॉ. राजेंद्र गोसावी यांनी बेरोजगार युवक, युवती, महिला आणि पुरुषांना स्वतःच्या पायावर उभे करून आत्मनर्भर करण्याचे स्वप्न बाळगले होते. हे स्वप्न सत्यामध्ये उतरवण्यासाठी त्यांना नुकतीच कर्मवीर भाऊराव पाटील यांची "कमवा व शिका' ही योजना भावली. 

कोरेगाव (जि. सातारा) : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केलेली "कमवा व शिका' ही योजना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या "आत्मनिर्भर भारत' या घोषणेतून प्रेरणा घेऊन येथील एका तरुण डॉक्‍टरने आपल्या वैद्यकीय अस्थापनांत बेरोजगारांसाठी "कमवा व शिका' ही योजना आणली आहे. त्यातून दहावी पास, नापासपासून अगदी कोणत्याही शाखेमधील पदवीधर युवक, युवती, महिला आणि पुरुषांना विद्यावेतनासह प्रशिक्षण देऊन भविष्यात 100 टक्के नोकरीची हमी देण्यात येणार आहे. 

कोरेगाव येथील डॉ. राजेंद्र गोसावी यांनी वैद्यकीय सेवा करताना सामाजिक बांधिलकी जपलेली आहे. पाणी, पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण व संवर्धन, आधुनिक शेती, प्राणी व पक्षी आश्रय, साहित्य, शास्त्रीय संगीत, नाटक, धार्मिक, आध्यत्मिक क्षेत्रातही त्यांचा मुक्तसंचार असतो. डॉ. राजेंद्र यांनी बेरोजगार युवक, युवती, महिला आणि पुरुषांना स्वतःच्या पायावर उभे करून आत्मनर्भर करण्याचे स्वप्न बाळगले होते. हे स्वप्न सत्यामध्ये उतरवण्यासाठी त्यांना नुकतीच कर्मवीर भाऊराव पाटील यांची "कमवा व शिका' ही योजना भावली. त्याच पद्धतीने त्यांनी आपल्या श्रीरंग नर्सिंग होम आणि सुनंदा डायलिसिस सेंटरमध्ये युवक, युवती, महिला व पुरुषांना विद्यावेतनासह प्रशिक्षण देऊन पुढे कायम नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचे मनोमन ठरवले आहे. 

डॉ. राजेंद्र यांनी वैद्यकीय क्षेत्रातील "कमवा व शिका' योजनेतील पहिल्या टप्प्यात आरोग्य सहायक, डायलिसिस तंत्रज्ञ, एक्‍स-रे तंत्रज्ञ, औषधी सहायक, कार्यालयीन सहायक अर्थात वैद्यकीय साहित्य गृहपाल, ओटी असिस्टंट, कॅथलॅब तंत्रज्ञ, लिथ्रोटीसी तंत्रज्ञ, सुरक्षा रक्षक, वॉर्ड बॉय व मावशी, गृहपाल, इसिजी तंत्रज्ञ, लॅब तंत्रज्ञ, डेंटल डॉक्‍टर सहायक आदी 15 पदांवर सुमारे 100 जणांना विद्यावेतनासह प्रशिक्षण, प्रमाणपत्रासह नोकरीची 100 टक्के हमी देण्याचे नियोजन केले आहे. साधारण एक 
वर्षांचे हे प्रशिक्षण असणार आहे. अधिक माहितीसाठी डॉ. राजेंद्र गोसावी, श्रीरंग नर्सिंग होम, लक्ष्मीनगर, कोरेगाव येथे संपर्क साधावा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Salary During Training And Then Job