सांगवी परिसरातील तरुणाई वाममार्गाकडे

दीपक मदने
Thursday, 17 September 2020

कोरोनाच्या संसर्गात शाळा, कॉलेज बंद असल्याने युवक हे मोकळ्या वेळेत मटका, जुगार खेळत असल्याने तरुणाई वाममार्गाकडे वळत असल्याचे चित्र दिसत आहे. 
 

सांगवी : कोरोनाच्या संसर्गात शाळा, कॉलेज बंद असल्याने युवक हे मोकळ्या वेळेत मटका, जुगार खेळत असल्याने तरुणाई वाममार्गाकडे वळत असल्याचे चित्र दिसत आहे. परिसरात देशी दारूविक्रीही मोठ्या प्रमाणात होताना दिसते. त्याला तरुणाई आहारी जात आहे. त्यामुळे पालकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. 

फलटण शहर व परिसरात खुलेआम मटका, जुगार व्यवसाय सुरू असून वरदहस्तामुळे हे व्यवसाय जोमात सुरू आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबे अडचणीत येण्याचा धोका निर्माण झाला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी पालकांसह महिला वर्गातून केली जात आहे. फलटण परिसरात भाडळी, रावरामोशी पूल परिसर, मिरगाव, झिरपवाडी, वाखरी, ढवळ, सुरवडी, शुक्रवार पेठ, जुनी भाजी मंडई परिसर या ठिकाणी राजरोसपणे मटका, जुगार खेळण्यासाठी कॉलेज युवक, मजूर वर्ग येत असल्याचे चित्र आहे. त्यातून नवीन पिढी उद्‌ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. हे अवैध व्यवसाय बंद करण्यात यावेत, अशी मागणी महिलांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे केली आहे. 

फलटण पोलिसांच्या वरदहस्तामुळे हे व्यवसाय फोफावत असल्याची तक्रार अनेकांनी केली आहे. वरिष्ठांनी सुरू असलेले मटका, जुगार व्यवसाय बंद करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी महिलांसह नागरिकांनी केली आहे. 

फलटण शहर व परिसरात खुलेआम मटका, जुगार सुरू असून कोरोना संसर्गामुळे सरकारने जनतेला घरी राहण्याचे आवाहन करूनही कॉलेज युवक, मजूर वर्ग लोभापोटी मटका, जुगार खेळत आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबे उद्‌ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. प्रशासनाने तत्काळ मटका, जुगार व्यावसायिकांवर कारवाई करावी. 

- धनंजय महामुलकर, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना 

 

संपादन ः संजय साळुंखे 

 

साताऱ्यातील जम्बो हॉस्पिटलवर शुक्लकाष्ठ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara In sangavi Area youth has Pitcher and gambling