Satara
Satara

"होम क्वारंटाइन'च्या अंमलबजावणीत हलगर्जीपणा केल्याने "या' गावचा सरपंच अडचणीत

केळघर (जि. सातारा) : पुनवडीत मुंबईवरून प्रवास करून आलेल्या व्यक्तींनी होम क्वारंटाइनचे नियम न पाळल्याने कोरोनाचा उद्रेक झाला आहे. येथे आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग झाला असून, भारतीय दंड संहितेच्या कलम क्रमांक 188 नुसार पुनवडी ग्रामपंचायतीच्या सरपंचांसह चार जणांवर प्रशासनाच्या वतीने गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती तहसीलदार शरद पाटील यांनी दिली. यापुढेही तालुक्‍यामध्ये बाहेरून प्रवास करून आलेल्या व्यक्तींनी नियम न पाळल्यास त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

पुनवडी येथे बाधितांची संख्या वाढत असून, सोमवारी रात्री तब्बल 15 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे पुनवडीतील बाधितांची संख्या 45 झाली आहे. कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या पुनवडीतील बाधितांची संख्या आता तालुक्‍यात सर्वाधिक झाल्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढू लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर आज अतिरिक्त जिल्हाधिकारी मनीषा आवळे यांनी पुनवडी येथे भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी तहसीलदार शरद पाटील, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवानराव मोहिते, वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना कवारे, सतीश मर्ढेकर, विशाल रेळेकर, अरविंद सोमवंशी, मोहन शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आवळे यांनी ग्रामस्थांकडून माहिती घेऊन अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून सूचना केल्या व साखळी खंडित करण्यासाठी प्रशासन तत्पर असून, ग्रामस्थांनीही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले. 

पुनवडीत आज आरोग्य विभागाच्या वतीने बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या घशातील स्रावांचे नमुने घेण्याचे काम सुरू होते. पुनवडीची लोकसंख्या 600 असून, यापैकी 250 हून अधिक व्यक्तींच्या घशातील नमुने घेण्यात येणार आहेत. पुनवडी येथील बाधित परिसरातील व्यक्तींच्या संपर्कात आले असल्यास या व्यक्तींनी स्वतःहून आरोग्य विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहिते यांनी केले आहे. 

ग्रामस्थ दडवताहेत माहिती 

पुनवडीत बाधितांची संख्या वाढू लागल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. ही साखळी खंडित करण्यासाठी आरोग्य विभाग काम करताना ग्रामस्थ माहिती लपवून ठेवत असल्याने प्रत्यक्ष संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती गोळा करणे आरोग्य विभागास कठीण होत असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. 

संपादन : पांडुरंग बर्गे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com