गुड न्यूज...महाबळेश्वरात एकाचवेळी 328 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती!

Satara
Satara

भिलार (जि. सातारा) : महाबळेश्वर तालुक्‍यातील 32 विद्यार्थ्यांना चार लाख 31 हजार रुपये सुवर्णजयंती आदिवासी शिष्यवृत्ती मंजूर झाली असून, प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात शिष्यवृत्ती उपलब्ध झाल्याने पालकांनी शिक्षण विभागाचे अभिनंदन केले आहे. 

महाबळेश्वर तालुका हा दुर्गम, डोंगर-कपाऱ्यांमध्ये वसला असून, त्यामध्ये अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील समाजाचेही प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे. वर्षानुवर्षे वडिलोपार्जित व्यवसायावर उदरनिर्वाह करत राहणाऱ्या या जमातीमधील मंडळींकडे जमातीचे प्रमाणपत्र नसल्याने अनेक शासकीय योजनांचा लाभ मिळत नसल्याची कैफियत येथील मंडळींची कायम आहे. पंचायत समिती महाबळेश्वर अंतर्गत येणाऱ्या कार्यक्षेत्रातील 181 शाळांत सर्व प्रवर्गामधील 17 हजार 910 विद्यार्थी शिक्षण घेत असून, त्यापैकी दोन हजार 804 विद्यार्थी अनुसूचित जमातीमधील आहेत. त्यापैकी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत सुवर्णमहोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती योजनेसाठी इयत्ता पहिली ते दहावीअखेरच्या 328 विद्यार्थ्यांचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविले असता सर्वच्या सर्व प्रस्ताव मंजूर होवून शिष्यवृत्तीची चार लाख 31 हजार रुपये रक्कम विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यावर जमा करण्यात आली आहे. 

पहिली ते चौथीअखेर विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी 1000 रुपये, इयत्ता पाचवी ते सातवीअखेर विद्यार्थ्यांसाठी 1500 रुपये, तर इयत्ता आठवी ते दहावीअखेर विद्यार्थ्यांना 2000 रुपये शिष्यवृत्ती मंजूर झाल्याने संबंधित विद्यार्थ्यांसह पालक व मार्गदर्शक शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. 

शिष्यवृत्ती प्रस्तावांचे संकलन ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे यांचे सूचनेनुसार तालुक्‍याच्या सभापती अंजना कदम, उपसभापती संजय गायकवाड, सदस्य रूपाली राजपुरे, आनंदा उत्तेकर, सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, गटविकास अधिकारी नारायण घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली गटशिक्षणाधिकारी आनंद पळशीकर, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक व संघटनेचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी केल्याने तालुक्‍यातील शिक्षण विभागाविषयी समाधान व्यक्त केले जात आहे. 


""एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत सुवर्णमहोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती योजनेसाठी पाठवलेल्या सर्वच विद्यार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर होऊन शिष्यवृत्ती मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि महाराष्ट्रात पहिलाच तालुका असेल याबाबत गटशिक्षणाधिकाऱ्यांचे योग्य नियोजन आणि दूरदृष्टी कामी येत असून, यामुळे तालुक्‍याच्या शिक्षण विभागाला वेगळी ऊर्जा प्राप्त झाली आहे.'' 
-बाळासाहेब भिलारे, ज्येष्ठ नेते, भिलार 

संपादन : पांडुरंग बर्गे  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com