मूर्तिकार अडचणीत; उंच गणेशमूर्तींचं करायचं काय?

संताेष चव्हाण
Wednesday, 5 August 2020

अनेक मूर्तिकारांनी दर वर्षीप्रमाणे प्रत्येक मंडळाच्या मूर्ती बनवण्यात आल्या. आता या मूर्ती शिल्लक राहणार असल्याने मूर्तिकारांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यातच शासनाने तीन ते चार फुटांच्या छोट्या मूर्ती बसवण्याच्या आदेशामुळेही मोठ्या मूर्तींमध्ये होणारा आर्थिक फायदा बुडला आहे. 

उंब्रज (जि. सातारा) ः गणेशोत्सव जवळ आल्याने ग्रामीण भागातील कारागीर मूर्ती बनवण्यात मग्न आहेत. सध्या उंब्रजसह परिसरात मूर्ती बनवण्याचे काम जोरात सुरू आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कामाचा वेगही वाढला आहे; परंतु कोरोना व "एक गाव, एक गणपती' उपक्रमामुळे हा उद्योग आर्थिक गर्तेत सापडला असल्याने मूर्तिकार अडचणीत आले आहेत. 

गेल्या अनेक वर्षांपासून येथील मूर्तिकारांनी आपला वंशपरंपरागत व्यवसाय जपला आहे. उंब्रजसह परिसरातील गावातील लोक, सार्वजनिक गणेश मंडळांचे कार्यकर्ते हे गणेशमूर्ती खरेदी करण्यासाठी येथे येतात. लाखो रुपयांची उलाढाल होत असलेल्या या व्यवसायाला यंदा कोरोनामुळे ग्रहण लागले आहे. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. कोरोनामुळे व्यावसायिकांना मूर्ती बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल, मजूर अशा अनेक अडचणींमुळे मूर्ती उशिरा बनवण्यास सुरुवात झाली होती. 

अनेक सार्वजनिक मंडळे, घरगुती गणेश उत्सवसाठी हव्या तशा गणेशमूर्तींसाठी ऑर्डर देण्यासाठी दर वर्षी वर्दळ सुरू असते. वेगवेगळ्या संकल्पनेतील मूर्तींना विशेष मागणी असते. सध्या कोरोनामुळे कच्चा माल, इंधन दरवाढीचा परिणाम मूर्ती कामावर झाल्याने दर वाढण्याची चिन्हे आहेत. उंब्रज परिसरात 40 ते 50 गणेश मूर्तिकार असून, माती मळण्यापासून ते रंगकामापर्यंतची सर्व कामे अनेक मालकांना स्वतःसह कुटुंबीयांना सोबत घेऊन करावी लागतात. 

तारळे, मसूर, चाफळ या भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे गावामध्ये "एक गाव, एक गणपती' बसवणार आहेत. त्याचा परिणाम उद्योगावर झाला आहे. उंब्रजसह परिसरातील गावामध्ये सरासरी पाच ते सहा मंडळे गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करतात. त्यामुळे अनेक मूर्तिकारांनी दर वर्षीप्रमाणे प्रत्येक मंडळाच्या मूर्ती बनवण्यात आल्या. आता या मूर्ती शिल्लक राहणार असल्याने मूर्तिकारांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यातच शासनाने तीन ते चार फुटांच्या छोट्या मूर्ती बसवण्याच्या आदेशामुळेही मोठ्या मूर्तींमध्ये होणारा आर्थिक फायदा बुडला आहे. एकूणच हा उद्योग अडचणीत सापडला आहे. 

(संपादन ः संजय साळुंखे) 

 

जावळीतील या दुर्गम गावात सामुहिक शेतीचा नारा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Sculptor in trouble; What to do with tall Ganesha idols?