बीजरूपी नाम मातीत रुजले अन्‌...

man
man

गोंदवले (जि. सातारा) : बीजरूपी नाम मातीत आणि मनातही रुजले अन्‌ गुरुपौर्णिमेदिवशीच इवल्याशा रोपांतून दिसलेल्या श्री महाराजांच्या छबीने मन गहिवरले. चिंचवड येथे श्रींचे भक्त प्रशांत कुलकर्णी यांनी पंचबीजांच्या उगवणीतून श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची छबी घरातच साकारली. या कलाकारीने "जिथे नाम तिथे माझे प्राण' या श्रींच्या बोध वचनाचा पुन्हा प्रत्यय आल्याच्या भावना भाविकांमधून व्यक्त झाल्या. 

भक्तिसेवा हा भाव मनात ठेऊन भाविकांकडून श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची मनोभावे सेवा केली जाते. नामस्मरणाबरोबरच कोणी भजन, कीर्तन तर कोणी मंदिर परिसरातील कामांना हातभार लावून श्रींची सेवा करून समाधान मानतात. गोंदवल्यातील समाधी मंदिरात येऊन दिग्गज कलाकार आपल्या कलाकारीतून श्रींच्या चरणी लीन होतात. त्याचप्रमाणे प्रशांत कुलकर्णी हे श्रींची सेवा करतात. गोंदवल्यातील पुण्यतिथी महोत्सव, श्रीराम नवमी उत्सव आणि गुरुपौर्णिमा उत्सवात ते श्रींच्या छबीतील वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकारी साकारतात. 


गुरुपौर्णिमेच्या उत्सवात श्रींची भक्ती आगळ्यावेगळ्या स्वरूपात करण्यासाठीची कल्पना देखील त्यांनी अनेक महिन्यांपासून योजली होती; परंतु लॉकडाउनमुळे गोंदवल्यात येणे शक्‍य नव्हतेच; परंतु भक्तिसेवेला वेळ, काळ, स्थळाचे बंधन नसते, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले. मनातील कल्पना त्यांनी चिंचवड येथील घरातच साकारली अन्‌ बीजरूपी नामातून श्रींची छबी निर्माण झाली. 

गुरुपौर्णिमेदिवशी गुरूंचे दर्शन घडावे, यासाठी त्यांनी काही दिवस आधीच तयारी सुरू केली. शेतात पिकांची पेरणी केल्यानंतर एका ओळीत उगवणाऱ्या रोपांची कल्पना मनात ठेऊन देवघरात जमिनीवर सहा फूट लांब आणि पाच फूट रुंद अंतरावर मातीचा वाफा तयार केला. त्यामध्ये ज्वारी, नाचणी, मोहरी, उडीद आणि राजगिरा यांच्या बिया उगवणीच्या काळानुसार पेरण्यात आल्या. या बियांना जास्त पाणी दिले तर त्या पेरलेल्या ठिकाणावरून जागा बदलू शकतील म्हणून खास काळजी घेण्यात आली. ठराविक काळाने छोट्या स्प्रे बॉटलच्या साह्याने या वाफ्यात पाणी शिंपडण्यात आले. गुरुपौर्णिमेदिवशी हवी तेवढी रोपांची वाढ झाली. या वाफ्यातील रोपांतून श्री महाराजांची प्रतिमा स्पष्ट दिसू लागली. श्रींच्या या कृषी रूपी प्रतिमेचे पूजन कुलकर्णी कुटुंबीयांनी केले. 


गुरुपौर्णिमेला गोंदवल्याला जात आले नाही; परंतु या अनोख्या कलाकारीतून घरीच गुरू भेट झाल्याचा आनंद आहे. 

- प्रशांत कुलकर्णी, चिंचवड-पुणे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com