शेरे गावात रक्षाविसर्जनाऐवजी वृक्षारोपण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

वाढत्या प्रदूषणामुळे निसर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. जगालाही त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. त्यातून हल्ली प्रदूषणाबाबत नागरिक जागरुक होऊ लागले आहेत. कऱ्हाड तालुक्‍यातील शेरे येथेही नदीतील पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी रक्षाविसर्जनाऐवजी फळझाडे लावली जात आहेत. 

रेठरे बुद्रुक (जि. सातारा) ः पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी शेरे येथे रक्षाविसर्जनऐवजी त्यावर वृक्षारोपणाची पद्धत रुजत आहे. निसर्ग संवर्धनासाठी ही परंपरा पुढे नेण्यासाठी ग्रामस्थही त्यात सहभागी होत आहेत. महिन्याभरापासून निधन झालेल्या गावातील तीन जणांची रक्षा विसर्जित न करता त्यावर फळझाडे लावण्यात आली. 

कृष्णेकाठी असणाऱ्या शेऱ्यात निधन झालेल्या व्यक्तीच्या रक्षेचे नदीत विसर्जन करण्याची पद्धत आहे. या पद्धतीमुळे नदीतील पाण्याचे प्रदूषण होते. ती परंपरा बदलण्यासाठी गावातील माणिक शंकर निकम यांनी गेल्या वर्षापूर्वी त्यांच्या वडिलांच्या रक्षा शेतात टाकून त्यावर फळझाड लावले. त्यांनी हा नवा पायंडा घालून दिला. त्यानंतर महिन्यापूर्वी गावातील विश्वनाथ भास्कर पाटील व वैजयंता भगवान काळे यांच्या रक्षाविसर्जनऐवजी त्यावर फळझाडे लावली आहेत. काही दिवसांपूर्वी शांताबाई आनंदा बडेकर यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी ही परंपरा सुरू ठेवली.

नदीत रक्षाविसर्जन केल्याने पाण्याचे प्रदूषण होते. त्यातून होणाऱ्या दुष्परिणांमाबाबत तेथील माऊली ग्रामविकास प्रतिष्ठान जनजागृती करत आहे. लोकांनी जल, वायू प्रदूषण कमी करण्यासाठी सजग झाले पाहिजे, यासाठी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते वैयक्तिक मार्गदर्शन, प्रसंगी मदतही करतात. (कै.) बडेकर यांच्या घरची परिस्थिती बेताची आहे. त्यांच्या कुटुंबीयांना प्रतिष्ठानने आंब्याचे रोप देऊन ते बडेकर यांची आठवण म्हणून लावले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Shere Villagers Immerseed Ash of Funeral In tress