सातारा : ‘निष्‍ठा’‍वंतांच्या गर्दीने शिवसेनेला उभारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shivsena

सातारा : ‘निष्‍ठा’‍वंतांच्या गर्दीने शिवसेनेला उभारी

पाटण : कोणत्याही बड्या राजकीय नेत्याचे पाठबळ नसताना आणि शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांनी बंड केल्यानंतर तालुक्यात पहिल्यांदाच झालेल्या शिवसेनेच्या सभेतील गर्दीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदार देसाई यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार प्रहार करून मल्हारपेठचे राजकीय मैदान जिंकले. माजी आमदार दगडूदादा सपकाळ, नरेंद्र पाटील यांच्या आक्रमक भाषणाने सभेला रंगत आणली. आदित्य ठाकरेंच्या निष्‍ठा यात्रेने तालुक्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना चैतन्य आणले.

शिवसेनेतील बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा तालुक्यात यशस्वी करण्यात शिवसेनेचे नूतन जिल्हाध्यक्ष हर्षद कदम व सहकाऱ्यांना यश आले. कोणताही बडा राजकीय नेता सोबत नसताना आणि शिवसेनेचे आमदार देसाई यांनी बंडखोरी केली असताना सभेला लोक जमतील का? अशी सर्वांनाच शंका होती. मात्र, दुपारी दोनला होणारी सभा पावणेतीन तास उशिरा सुरू होऊनही भर उन्हात लोक पावणेतीन तास जागचे हलले नाहीत, हे या सभेचे वैशिष्ट्य ठरले. आदित्य ठाकरे यांनी संपूर्ण भाषणात बंडखोर आमदार देसाई यांचा नामोल्लेख टाळला.

अर्धा तासाच्या भाषणात गद्दार, गद्दारी आणि विश्वासघात या तीन शब्दांचा अनेकदा उल्लेख केला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ऑपरेशनची परिस्थिती आणि षडयंत्र याबाबत कडक शब्दात वारही केले. बंडखोरांना थोडी जरी लाज, शरम आणि हिम्मत असेल तर राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जावे, असे आव्‍हान त्यांनी बंडखोरांना दिले. त्यास कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत दाद दिली. माजी आमदार दगडूदादा सपकाळ, नरेंद्र पाटील यांनी देसाई कुटुंबाच्‍या पाच वेळा झालेल्या पराभवावर बोट ठेवले.

शिवसेनेमुळे आमदारकीचा टिळा लागला, असे डिवचताना दगडूदादांनी पुन्हा या गद्दाराला विधानसभा नाही, असा घणाघात तर नरेंद्र पाटील यांनी खालच्या पातळीवर देसाई यांच्यावर निशाणा साधला. कोयना विभागापुरती मर्यादित शिवसेना वनकुसवडे पठार, मोरगिरी व ढेबेवाडी विभागात विस्तारतेय, हे या सभेने अधोरेखित केले आहे. या सभेने शिवसैनिकांचा उत्साह वाढला आहे.

सभेच्या फलिताची तालुक्यात चर्चा

सभेनंतर तासाभरात बंडखोर आमदार शंभूराज देसाई यांनी मुंबई येथून व्‍हिडिओ व्हायरल करत सभेला उत्तर दिले. दगडूदादा सपकाळ यांची पडण्याची हौस भागली आहे, त्यांनी मला पाडायच्या वल्गना करू नयेत, नरेंद्र पाटील यांचा नाव न घेता ‘फडतूस कार्यकर्ता’ असा उल्लेख व पाटलांची पत्नी दुसऱ्या पक्षात असल्याचा आरोप केला. आदित्य ठाकरेंच्या गद्दार शब्दावर ‘आम्ही गद्दार नाही'', बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जपतोय, असे स्पष्टीकरण देत ठाकरे कुटुंबाने अडीच वर्षे राष्ट्रवादी व काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसविले, ही प्रतारणा आहे, असा पलटवार करत जमलेली गर्दी राष्ट्रवादी पुरस्कृत निष्ठा यात्रा, असा आरोप केला. सभा राष्ट्रवादी पुरस्कृत होती, बाहेरून माणसे आणली होती, असा टोला आमदार देसाई यांनी लगावला, हे या सभेचे फलित असल्याची तालुक्यात चर्चा आहे.

Web Title: Satara Shiv Sena Was Raised Crowd Of Loyal

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..