पाेलिसांच वागणं बरं नव्हं, शिवेंद्रसिंहराजेंची गृहमंत्र्यांकडे तक्रार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

सामान्य पर्यटकांवर कारवाई करणे अयोग्य आहे. हुल्लडबाज टोळक्‍यांवर, मद्य प्राशन करून धिंगाणा घालणाऱ्यांवर आणि बेदरकारपणे वाहने चालवणाऱ्यांवर, तसेच कोरोनासंबंधीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी शिवेंद्रसिंहराजे यांनी केली.

सातारा : कास पठार हे जागतिक वारसा स्थळांमध्ये नोंद झालेले पर्यटनस्थळ आहे. कास तलाव आणि कास पठार येथे देशी, परदेशी पर्यटकांसह स्थानिक लोक नेहमीच भेट देऊन निसर्गाचा आनंद घेतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कासला जाणाऱ्या पर्यटकांवर पोलिस प्रशासनाकडून सरसकट कारवाई केली जाते, हे चुकीचे आहे. पोलिसांनी सरसकट कारवाई न करता हुल्लडबाज, गोंधळ घालणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, सामान्य लोकांना त्रास देऊ नये, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहाजे भोसले यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली.
 
मंत्री देशमुख हे जिल्हा दौऱ्यावर होते. कोरोना परिस्थिती आणि कायदा व सुव्यवस्थेबाबतच्या आढावा बैठकीत शिवेंद्रसिंहराजे यांनी कास पर्यटकांवर होणाऱ्या कारवाईचा मुद्दा उपस्थित केला. या वेळी पालकमंत्री बाळसाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील यांच्यासह सर्व आमदार, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते उपस्थित होते.
 
शाहूपुरी पोलिस ठाण्याची इमारत भाडेतत्त्वावर आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या पोलिस ठाण्यासाठी तातडीने जागा उपलब्ध करून द्यावी, तसेच त्या जागेत इमारत उभारावी. पोलिस कर्मचाऱ्यांसाठी नवीन वसाहत, इमारत उभारण्याचे काम सुरू आहे. मात्र, हे काम पूर्ण झाले नसून कर्मचाऱ्यांचे हाल होत आहे. त्यामुळे या इमारती लवकरात लवकर पूर्ण कराव्यात, असे शिवेंद्रसिंहराजेंनी निदर्शनास आणून दिले. कास पठार हे जागतिक पर्यटनस्थळ असून, दर वर्षी हजारो पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात. निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आणि कुटुंबीयांसमवेत विरंगुळा म्हणून शनिवार, रविवार, सुटीच्या दिवशी असंख्य सातारकर कासला फिरायला येतात. गेल्या काही दिवसांपासून पोलिस दलाकडून कासला जाणाऱ्या पर्यटकांवर सरसकट कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. या पर्यटकांत लहान मुले, वयोवृद्ध आणि महिला यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. पर्यटकांना काठीने मारण्याचा व्हिडीओसुद्धा व्हायरल झाला. हा प्रकार पूर्णपणे चुकीचा आहे. सामान्य पर्यटकांवर कारवाई करणे अयोग्य आहे. हुल्लडबाज टोळक्‍यांवर, मद्य प्राशन करून धिंगाणा घालणाऱ्यांवर आणि बेदरकारपणे वाहने चालवणाऱ्यांवर, तसेच कोरोनासंबंधीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी शिवेंद्रसिंहराजे यांनी केली. यावर मंत्री देशमुख यांनी याबाबत पोलिस प्रशासनाने खबरदारी घ्यावी, अशी सूचना अधिकाऱ्यांना केली. 

Video : असा मिटवा वीज बिलांचा घाेळ शिवेंद्रसिंहराजेंची महावितरणास सूचना 

उदयनराजे पुन्हा मैदानात; राज्य सरकारकडे केली ही मागणी

या शुक्रवारी तुम्ही बदलू शकता तुमचं नशीब; 130 मिलियनचा जॅकपॉट जिंकण्याची मोठी संधी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Shivendrasinghraje Bhosale Complaints About Police Department To Home Minister