
गोंदवले (जि. सातारा): कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवावर बंधने आली असली, तरी "एक गाव, एक गणपती'ची परंपरा अखंडित 166 वर्षे जोपासणाऱ्या नरवणेकरांनी "गो कोरोना'बरोबर सुदृढ आरोग्यासाठी अखंडित प्रयत्न करण्याचा ध्यास घेतला आहे.
नरवणे येथील गणेशोत्सवाला आगळीवेगळी परंपरा आहे. सर्वधर्मीयांनी एकत्र येऊन गेल्या सुमारे 166 वर्षांपासून "एक गाव, एक गणपती'ची परंपरा जपली आहे. येथील गणेशोत्सव म्हणजे गावाची यात्रा. ही यात्रा मोठ्या उत्साहात आणि विविध धार्मिक कार्यक्रम, स्पर्धा, गजीनृत्य, कुस्त्यांचे फड आदींच्या माध्यमातून गावपण जपत असल्याचे दिसते. यंदा मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या यात्रेवर देखील बंधन आले आहे. गणेशोत्सवातील गर्दी टाळून कोरोनाचा प्रसार रोखण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला असला, तरी नरवणेकरांनीदेखील अगदी सध्या पद्धतीनेच यंदाचा उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या वेळी सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
गणेशोत्सवात गावात अखंड हरिनाम सोहळ्याची परंपरा असून, ही परंपरा यंदाही मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत सुरू ठेवण्यात आली आहे; परंतु इतर स्पर्धा व मनोरंजनाच्या कार्यक्रमांऐवजी यंदा सामाजिक कार्यक्रमांचा महोत्सव राबविण्याचा निर्णय यात्रा समिती व ग्रामस्थांनी घेतला आहे. या महोत्सवाचे सुरुवात ग्रामस्वच्छतेपासून करण्यात आली आहे. येथील गणेश घाट परिसर व गावातील मुख्य परिसरात ग्रामस्थांनी स्वच्छतेला सुरुवात केली. या वेळी सरपंच दादासाहेब काटकर, यात्रा समितीचे अध्यक्ष बाळासाहेब काटकर, पोलिस पाटील विजयसिंह काटकर, प्रदीप महामुनी, कृष्णा काटकर, नवनाथ काटकर, दशरथ काटकर, गौरीहर काटकर, दशरथ चव्हाण, नाथा चव्हाण, रणजित काटकर, मालोजी काटकर उपस्थित होते.
""श्री गणेश यात्रेतील नियमित कार्यक्रम रद्द केलेले असले, तरी सोशल डिस्टन्सिंग व शासनाचे नियम पाळून ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन, दारूमुक्ती आदी कार्यक्रमांचा महोत्सव राबवित आहोत. या उपक्रमाद्वारे गावाचा एकोपा कायम राखण्याचा प्रयत्न होत असल्याचे समाधान आहे.''
- मनोहर काटकर, ग्रामस्थ, नरवणे
संपादन : पांडुरंग बर्गे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.